शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर देत टिका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पातळीच राहिलेली नाही. या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या विषारी सापाच्या तोंडून हिरवे फुत्कार केवळ मतांच्या लाचारीसाठी येताहेत, अशा शब्दांत दरेकर यांनी आव्हाडांवर तोफ डागली आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, अजित पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणे अशा प्रकारच्या गोष्टी ठरवून आव्हाड करताहेत. अजित पवारांना नामर्द म्हणत असताना माझे आव्हाडांना आव्हान आहे एका ठिकाणी अजित पवारांनी उभे राहावे दोन-चार वाक्ये बोलावित आणि दुसऱ्या बाजूला आव्हाडांनी उभे राहावे. तुमच्या बोलण्या-वागण्यात मर्द कोण आहे आणि नामर्द कोण आहे हे देहबोलीतून दिसून येईल. तसेच म्हाडात गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना दरोडे टाकण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केलेय, ते दरोडे निवडणुकीत लोकांसमोर आम्ही उघडं करू, असा इशाराही यावेळी दिला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर म्हणाले की, निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचे काम करते. पक्ष म्हणून काम करत असताना निवडणुकीत पक्ष नेतृत्वाला भुमिका पार पाडायच्या असतात. त्या पार पाडत असतो. हेलिकॉप्टर अधिकृत होते, मान्यता होती. एबी फॉर्म पाठवणे हा काही गुन्हा नाही. निवडणूक आयोग त्यांच्यापरीने तपास करेल. शिवसेना त्यांच्या परीने उत्तर देईल.
पंतप्रधान मोदींची १४ ला शिवाजी पार्क येथे सभा आहे. मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना भाजपने समर्थन दिले आहे. या सभेला राज ठाकरे यांना निमंत्रित करणार का? या प्रश्नावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, त्यांना आमंत्रित करणे किंवा न करणे हा विषय पक्ष पातळीवर होत असतो. आमचे शीर्षस्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील नेते निर्णय घेऊ शकतील. तसेच भाजपाने कृतघ्नतेच्या भावनेतून अमित ठाकरे यांना समर्थन देण्याचे सुतोवाच केले आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारण करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. लोकसभेत राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला असेल तर त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या चिरंजीवाच्या ठिकाणी आम्ही समर्थन देत असू तर तो सभ्यतेचा आणि संस्कृतीचा भाग महाराष्ट्राच्या राजकारणात ठरू शकतो, असेही दरेकर म्हणाले.
जरांगे यांच्या विधानावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, आम्ही पण वाट पाहतोय की ते मराठा समाजासाठी काम करताहेत की पवार, ठाकरे व महाविकास आघाडीसाठी काम करताहेत. त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी पडतील तेव्हा कळेल त्यांच्या मनात नेमकं काय राजकारण होते की मराठा समाजाच्या हिताचे केवळ ढोंग केले होते हे त्यांचे उमेदवार आल्यावर तपशीलवार बघून, अभ्यास करून जरांगे यांचे मराठा समाजाबाबत मत काय आहे हे स्पष्ट होणार आहे.
जरांगे यांनी फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रविण दरेकर म्हणाले की, अशाच राणाभीमदेवी थाटात घोषणा करत रहा. तुमचे खरे स्वरूप मराठा समाजाला उमेदवारी जाहीर झाल्यावर दिसणार आहे. देवेंद्र फडणवीस तुमच्या नादाला लागतंच नाहीत. त्यांना खूप काम आहेत. राज्याचे नेतृत्व करायचे आहे. तुम्ही हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर नाही. तुमच्या नादाला लागण्यासाठी त्यांनाही वेळ नाही. तुम्ही बेजार कोणासाठी होताय हे निवडणुकीतील उमेदवार जाहीर झाल्यावर कळणार आहे.
Marathi e-Batmya