राज ठाकरे घसरले प्रसारमाध्यमांवर, अनौपारीक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये

हिंदी भाषेच्या विरोधात मराठी माणसांनी राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे राज्य सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णयच रद्द केला. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच वर्षानंतर एकत्र येत या विजयी लढ्याबद्दल मेळावा घेत विजयोत्सव साजरा केला. दरम्यान त्यांच्या एका वक्तव्याचा विपर्यास्त करत काही माध्यमांनी काही बातम्या चालवल्या. त्यामुळे एकप्रकारे चुकीचा संदेश मराठी माणसांमध्ये गेला.

यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले की, १४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं होतं असे सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? असा सवाल करत कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा असल्याचे मत व्यक्त करत आशाही केली.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल अशी आशा व्यक्त केली.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन असेही निक्षूण सांगितले.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *