देशातील प्रश्न संपत नसताना आपण युद्धाला सामोरे जात आहोत, ही गोष्ट योग्य वाटत नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही नसल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे देशात ‘मॉकड्रिल’ नाही तर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची गरज असल्याचे रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूरचे’ देशभरातून कौतुक होत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवत सरकारला खडे बोल सुनावले.
यासंदर्भात बुधवारी, माध्यमांसमोर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, असा सवाल करत याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. अमेरिकेमध्ये दोन ट्विन्स टॉवर पाडले, म्हणून त्यांनी तिकडे जाऊन काही युद्ध केले नाही. अमेरिकेने ते अतिरेकी शोधून ठार मारले. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचे लक्ष भरकटवणे किंवा युद्ध करणे हा पर्याय नसल्याचा टोलाही यावेळी पंतप्रधान मोदी यांना लगावला.
शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तान आधीच बरबाद झाला आहे, त्याला आणखी काय बरबाद करणार ? असा सवाल करत सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून ते भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. ही गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेवज कार्यक्रमाला उपस्थिती लावली. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या असा खोचक सूरही यावेळी लगावला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून झालेला एअरस्ट्राईक आणि एकूणच परिस्थिती आणि केंद्र सरकारकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल माध्यमांशी संवाद साधला. pic.twitter.com/GEQTSidGzS
— Raj Thackeray (@RajThackeray) May 7, 2025
Marathi e-Batmya