शरद पवार यांची खोचक टीका, …नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे

नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील १ टक्का सुद्धा काही खरं नाही. ज्यावेळी देश चालवायचा असेल, त्यावेळी जाती-धर्माचा विचार करून देश चालवता येईल का? नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे असा उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी विचारतात, की मी काय केलं? पण १० वर्षांचा त्यांचा स्वतःचा अनुभव घेतला, तर ते ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या राज्यातील शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे, मला घेऊन गुजरातला जायचे. त्या वेळी असं झालं, की मी इस्त्राईलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला. अमेरिकेने त्यांचा त्यावेळेस VISA नाकारला होता. त्यांनी सांगितलं, मला इस्राईलला तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे, मी त्यांना घेऊन गेलो. तिथल्या कृषी विषयक गोष्टी त्यांना ४ दिवस दाखवल्या. आज हे सगळं माहीत असताना हल्ली ते जे बोलतात, ते माझ्या मते राजकारण आहे दुसरं काही नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे, असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, बजेटबद्दल नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे आहे. बजेट हे कोणत्या जाती धर्माचे नसते, पार्लमेंटमध्ये जे बजेट मांडले जाते, ते देशाचे असते. असे असताना ते जे सांगत आहेत, की मुस्लिमांसाठी वेगळा अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा डाव होता तसे ते कधीही होत नाही व होऊ शकत नाही असेही सांगितले.

मुंबईतील नरेंद्र मोदी यांच्या रोड शो संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, मुंबईसारख्या शहरामध्ये ‘रोड शो’ आयोजित करणं हे शहाणपणाचे लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंडिशन भयंकर होत असते. त्यांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला, तो गुजराती परिसर आहे. मला कळत नाही, त्यांना जर रोड शो करायचं होतं तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला परिसर आहे. पण त्यांचं लक्ष एका वर्गातच होतं. त्याचा लोकांना त्रास झाला व लोकांच्या तक्रारी आल्याचेही सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या टीकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत आज जी विरोधी शक्ती आहे, त्याच्यात एक नंबरची जागा त्यांची आहे. ५ वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली, त्यात त्यांच्या ५८ जागा होत्या. आमचे ५२ होते आणि काँग्रेसचे काहीतरी ४८ किंवा ४५ होते. नकली शिवसेना म्हणजे काय ? आज शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे असेही स्पष्ट केले.

शरद पवार साहेब म्हणाले की, घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी मी जाऊन आलो. माझ्या मते मुंबई महानगरपालिका, त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. पण त्या संकटाची व्याप्ती इतकी होती, की एका दिवसात त्यांना यश येईल असं नाही. जे काम करत आहेत, त्यांच्यावर टीका करण्याची स्थिती नाही असेही यावेळी बोलताना सांगितले.

शरद पवार साहेब म्हणाले की, जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास यांचे काही नाते आहे, जे शिवछत्रपतींसाठी ओळखला जाते. लाचारी असेल, नाही असं नाही, पण त्याची पातळी देखील त्या लोकांनी सोडली. पण एक चांगलं झालं, की त्या लोकांनी सांगितलं, की पुन्हा आम्ही याची काळजी घेऊ असा उपरोधिक टोलाही प्रफुल पटेल यांचे नाव न घेता लगावला.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *