राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याचे मोठं विधान, ती भेट….पंकजा मुंडे राष्ट्रवादीत

राज्याच्या राजकारणातून भाजपांतर्गत काही नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात ओबीसी नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मागील काही महिन्यांपासून सातत्याने पंकजा मुंडे यांना डावलण्याचा आणि त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची चांगलीच घुसमट होत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाकडून आणि एमएमआरकडून ऑफर देण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मोठे विधान करत पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत मोठे विधान केले.

धाराशिव येथे अमोल मिटकरी हे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत विधान केले. पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. याबाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहीत आहे, असं विधान केले.

पंकजा मुंडेंची नाराजी आणि बीआरएसकडून दिलेल्या ऑफरबाबत विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले, मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होती. तेव्हापासूनच्या घडामोडी तुम्ही बारकाईने पाहत असाल, तर बऱ्याच प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परवा कारखान्याची निवडणूक झाली, तेव्हा दोघंही बहीण-भाऊ (पकंजा मुंडे व धनंजय मुंडे) सामंजस्याने एकत्र आले. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, पंकजा मुंडे राष्ट्रवादी पक्षात येतील. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे मलाही वाटतं की, त्या आमच्या पक्षात असाव्यात.

तसेच पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, बीआरएस ही अफूची गोळी आहे. बीआरएस हे नवीन गुलाबी वादळ आहे. बीआरएस किंवा एमआयएमने पंकजा मुंडेंना काय ऑफर द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या ऑफरला पंकजा मुंडे भाळतील आणि बीआरएसच्या गळाला लागलीत, असं मला वाटतं नाही. बीआरएसच्या गळाला जे लागले आहेत, त्यांचं महाराष्ट्रात भविष्य चांगलं नाही. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बीआरएसला अद्याप महाराष्ट्रातला चेहरा दिला नाही. त्यामुळे हे गुलाबी वादळ आहे, काही दिवसांत शांत होईल. मात्र पंकजाताई थोड्याच दिवसात त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, हे भाजपामध्ये फक्त चंद्रशेखर बावनकुळेंनाच माहीत आहे, असं सूचक विधानही अमोल मिटकरी यांनी केलं.

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत आल्या तर त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का? असं विचारलं असता अमोल मिटकरी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री कुणाला करायचं? हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. मला जेवढं माहीत आहे, त्यानुसार बहुजन समाजात ओबीसीसाठी मोठा लढा उभारणाऱ्या गोपीनाथराव मुंडेंच्या त्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्रात लीड करू शकतात. त्या कणखर नेतृत्व आहे. त्या आमच्या पक्षात आल्या तर आमच्या पक्षाचं बळ नक्कीच वाढणार आहे. राहिला प्रश्न मुख्यमंत्रीपदाचा तर तो सर्वस्वी निर्णय हा शरद पवारांचा असतो.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *