मेट्रो प्रकल्पग्रस्तांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नगरविकासमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ ची लांबी २४.९ किलोमीटर असून या मार्गावर १५ स्थानके प्रस्तावित केलेली आहेत. सुमारे ८ हजार ४१६.५१ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाचे ठाणे-भिवंडी आणि भिवंडी-कल्याण या दोन टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील स्थापत्य कामे प्रगतीपथावर असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे निवासी आणि अनिवासी मिळकतींचे पुनर्वसन एमएमआरडीएच्या मानपाडा, ठाणे येथील रेंटल हौसिंग योजनेंतर्गत करण्यात येणार आहे, तर बाधित व्यावसायिकांना २२५ चौरस फूटचा गाळा देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
मेट्रो प्रकल्पाचे काम करताना कमीत-कमी निवासी घरे बाधित झाले पाहिजेत अशा स्पष्ट सूचना एमएमआरडीएला देण्यात आल्या असून मेट्रोचे प्रकल्प करताना किंवा भूसंपादन करताना संबंधितांच्या संमतीनेच ते केले जाणार आहे. भिवंडी शहरातील उन्नत मेट्रो मार्गिकेचे भूमिगत मार्गिकेत बदल केल्यास पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीच्या बहुतांशी समस्या कमी होणार आहेत. उन्नत मार्गामुळे बाधित कुटुंबांची संख्या वाढू नये म्हणून हा मार्ग भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे ७३५ बांधकामे वाचले असून त्यासाठी मात्र एक हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त खर्च लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भिवंडीतील मल्टीनॅशनल गोदामे, तेथील कर्मचारी, नागरिक आणि वाढती लोकसंख्या पाहता ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसबरोबरच एमएमआरडीएने त्यांच्या माध्यमातून काही व्यवस्था करता येईल का याची व्यवहार्यता तपासून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश, महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करा चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक

मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *