विजय वडेट्टीवार यांचा इशारा, ओबीसींच्या जनगणेसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट,राज्य सरकारने यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवून कृती आराखडा बनवा

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली, मात्र जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही, यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली.

विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, ओबीसींच्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी बैठक होणार असून राज्यभर आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. धरणांमधील घटता पाणीसाठा, मराठवाड्यासह अनेक भागांतील दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून आपला कृती आराखडा जाहीर करावा,अशी मागणी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास राज्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने वेळ वाया न घालवता ठोस नियोजन आणि उपाययोजना कराव्यात असे म्हणाले.

देशात विरोधी पक्ष संपवण्याचे आणि एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही संस्थांवर दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचे राजकारण सुरू असून याबाबत देशातील जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील राजकारण सतत बदलत असते. पक्षात येण्या-जाण्याची प्रक्रिया सुरू राहते, मात्र कोणताही पक्ष किंवा विचार सहजपणे संपवता येत नाही. ठाकरे आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती यावरही विजय वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली. नागपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत या सर्व प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे स्पष्ट केले.

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता बदलण्यात आला, यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणले, गटनेता निवडीचे काम पक्षाच्या पत्रानुसार होत असते. पक्षाला जो निर्णय घ्यायचा आहे,तो पक्षश्रेष्ठी घेतील. याबाबत काही अधिक बोलायचं नाही अशी भूमिका  स्पष्ट केली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, आषाढी यात्रेसाठी एसटीच्या पाच हजार ५०० विशेष बसेस राज्यभरातून पंढरपूरसाठी एसटी बसेस सोडणार

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी यंदाही सज्ज झाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *