भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ होण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी केले. पालघर येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेत ते बोलत होते.
यावेळी उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार विलास तरे म्हणाले की, “जय जवान, जय किसान” ही घोषणा केवळ घोषवाक्य नसून देशाच्या सुरक्षितता व अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. देशाचे संरक्षण करणारा जवान आणि देशाला अन्नसुरक्षा देणारा शेतकरी हे राष्ट्राचे खरे सैनिक आहेत. जवान सीमारेषेवर देशरक्षणाचे कार्य करत असताना शेतकऱ्यांनीही राष्ट्रहितासाठी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून शेती उत्पादन वाढविण्याबरोबरच निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण उत्पादन करण्यावर भर दिला पाहिजे.” देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन भारताचे प्रधानमंत्री यांनी केले असल्याचे सांगत आमदार तरे म्हणाले की, राष्ट्रहितासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या स्तरावर योगदान देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून इंधन बचतीचा संदेश दिला असून त्याचे अनुकरण करत आपणही बोईसर विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रिक वाहनाद्वारे प्रवास करून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.
यावेळी त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना सांगितले की, पेट्रोल, डिझेल, गॅस यांसारख्या आवश्यक इंधनांच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते. त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यात वाढ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषीप्रधान देश म्हणून भारतातील शेतकरी जर फळे, भाजीपाला, धान्य, फुलशेती, सेंद्रिय उत्पादने तसेच प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त शेतीमालाचे उत्पादन वाढवून त्याची निर्यात केली, तर देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होऊ शकते. यामुळे देशाची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, गुणवत्तापूर्ण उत्पादन, शीतगृह सुविधा व निर्यात प्रक्रियेची माहिती घेऊन जागतिक बाजारपेठेच्या दृष्टीने शेती करण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार तरे यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले.
आमदार विलास तरे यांच्या अभ्यासपूर्ण व राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या भाषणास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात “जय जवान, जय किसान” अशा जोरदार घोषणा दिल्या. याप्रसंगी पालघर कृषी संशोधन केंद्र कृषी शास्त्रज्ञ डॉ. शौकत सय्यद, तालुका कृषी अधिकारी सतीश बागुल, शेतकरी, आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Marathi e-Batmya