मागील काही महिन्यांपासून अनेक सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि लब्ध प्रतिष्ठीत अशा सर्वच प्रकारच्या नागरिकांमध्ये सध्या एकच चर्चा होत असून ती म्हणजे, अमक्याचा औरा असा आहे, तमक्याचा-तमकीचा औरा तसा आहे, याशिवाय तुझ्या राशीत अर्थात संख्याशास्त्रानुसार याच गोष्टी घडणार, तर अमक्याची जन्मतारीख तमूक तमूक आहे म्हणून त्याच्या जीवनात अशाच गोष्टी घडणार, या उदाहरणासह आयुष्यात सतत येणाऱ्या अडचणीतून तुला मार्ग काढायचा असेल तर त्या गोष्टी रेमिडीज या अशा आहेत, या रेमेडिज जर उपयोग केला तर तुला होणाऱ्या त्रासातून काही प्रमाणात रिलीफ मिळेल असे काही प्रकार सध्या अनेक बाजूंनी कानावर येत आहेत.
त्यातूनच सध्या टॅरोट रिडींग, टॅरोटमधून एखाद्या बद्दलची केली जाणारी भविष्यवाणी, त्या भविष्यवाणीतून नेमके काय घडते आणि काय घडत नाही याचा अनुभव त्यांच्या त्याच्या मानसिकतेवर अलवंबून आहे. त्यातूनच नाशिकमध्ये नुकतेच जो काही प्रकार उघडकीस आला, तो म्हणजे, अशोक खरात याचे प्रकरण. त्यामुळे अशा श्रध्देतून अंधश्रध्देत परिवर्तीत झालेल्या लोकांना ज्या काही गोष्टींना सामोरे जावे लागते, ते वेगळेच. या गोष्टीतून एखादीच व्यक्ती सावरली जाऊ शकते, मात्र दुसरी तशाच पद्धतीने सावरू शकेल याबद्दल काही श्वाश्वती देता येत नाही. बरं सध्या जे काही अशा पद्धतीचे जे काही प्रकार सुरु आहेत तो काळ म्हणजे, आताचा २१ व्या शतकाचा काळ असल्याचे आवर्जून सांगावं लागेल.
सध्याच्या अत्याधुनिक आणि अडव्हॉन्स पद्धतीच्या काळात वावरणाऱ्या जगात वावरतो आहोत. पण आताच्या काळात अशा श्रद्धा-अंद्धश्रध्देवर भरवसा ठेवणारे अनेक असल्याचे दिसून येत आहे. नव्हे अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
परंतु लेखाच्या सुरुवातीला जे टायटल अर्थात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एनर्जी व त्यावेळचा १८ व्या आणि १९ व्या शतकाचा काळ आपणाला जाणीवपूर्वक पहावा लागणार आहे.
सुरुवातीला थोडक्यात आपण पाहु या की, महात्मा ज्योतिराव फुले,…
महाराष्ट्राच्या सामाजिक घुसळणीला, किंवा तेव्हाच्या सामाजिक वातावरण अर्थात धार्मिक आणि जातीवर आधारीत समाजव्यवस्था, तीही कर्मठ पद्धतीची, घराच्या ओसरीवर ब्राम्हणेतर समाजातील कोणी आला तर संपूर्ण घर दार स्वच्छ करणारी आणि त्या व्यक्तीची ३०-४० पिढ्यांचा उद्धार केला जात असे. त्यामुळे कर्मठ आणि सनातनी पद्धतीचे धार्मिक-जाती आधारीत व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणे किंवा तसे बंड दाखविण्याचे धाडस दाखवायचे म्हणाले तरी काय त्याचे धारिष्ट्य आहे त्याचे असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी होती.
पण अशा कर्मठ आणि सनातनी पद्धतीच्या समाजाशी आणि ती परंपरा आणि त्या पद्धतीची विचारधारा पाळणाऱ्या ब्राम्हण व ब्राम्हणेतर समुदायाला दोन चार सुधारणेचे मार्ग सांगणे म्हणजे, पुन्हा एकदा स्वतःचा पुर्नजन्म घालणे अशाच पद्धतीची गोष्टी म्हणावी लागेल.
महात्मा फुले हे माळी समाजाचे परंतु त्यांचा व्यवसाय हा ठेकेदारीचा होता, मुंबईतले क्रॉफर्ड मार्केट, मुंबई महापालिका, पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील बोगदा यासह अनेक गोष्टी या महात्मा फुले यांनी बांधकांम केल्याचे दस्तऐवज आपल्याला ठिकठिकाणी तर काही कागदपत्रांमध्ये आढळून येतील, परंतु महात्मा फुले यांना त्यांच्या व्यवसाय आणि त्यासाठी मिळणाऱ्या कामगारांचा विचार केला तर महात्मा फुले यांनी त्यांच्या ठेकेदारीच्या व्यवसायाला प्राधान्य देवून त्यांचे सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष करणे श्रद्धा-अंधश्रद्धेच्या नादाला लागून पापभीरू पध्दतीचे जगणे त्यांना सहज शक्य झाले असते.
मात्र महात्मा फुले यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनाकडे दुर्लक्ष करत सामाजिक कार्याला प्राथमिकता दिली. त्यातूनच पुण्यातील अनेक ब्राम्हण्य आणि त्या काळाच्या हिंदूत्वावादी-हिंदूत्ववादी विचारांची ओझे वाहणाऱ्या लोकांकडून टोकाचा विरोध झाला. तरी महात्मा फुले यांनी यातून माघार घेण्याऐवजी त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य पुढे तसेच सुरु ठेवले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी अर्थात सावित्री माई फुले यांना बायोलॉजिकल मुल होत नाही, म्हणल्यानंतर ते दुसरं लग्न करून मुलाला जन्म देऊन सहज राहु शकले असते. परंतु महात्मा फुले यांनी त्या गोष्टीच्यादृष्टीने कधी विचार केल्याचे कधी ऐकिवात किंवा वाचण्यातही आले नाही.
उलट महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्री माई फुले यांना शिक्षण दिले आणि पुणे येथील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु करुन त्या शाळेत पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीमाई फुले यांची नियुक्ती केली.
सावित्री माई फुले ह्या जेव्हा शाळेत शिक्षण देण्यासाठी जात तेव्हा त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची फुले किंवा त्यांच्यावर कोणत्या गोष्टी फेकून मारत मानसिक खच्चीकरण करण्याचा अश्लाघ्घ प्रकार केला जात होता हे आता एक ओपन सिक्रेट आहे.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांनी त्यांचा दत्तक मुलगा डॉ यशवंत याच्यासोबत राहत होत्या. मात्र पुण्यात प्लेगची साथ सुरु झाली. त्यामुळे एक प्रकराचा हाहाकार पुण्य़ात निर्माण झाला होता. परंतु सावित्रीमाई फुले या प्लेगचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची माहिती मिळवित आणि त्यास त्यांचा दत्तक पुत्र डॉ यशवंत याच्याकडे उपचारासाठी आणत. शेवटी या प्लेगचा संसर्ग सावित्रीमाईंना झालाच आणि त्यातच त्यांचा अंतही झाला.
महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले या दोघांनीही जर स्वतःचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार केला असता तर त्यांचे भविष्य आणि त्यावेळचा वर्तमान काळ चांगलाच गेला असता. परंतु त्या दोघांनीही सामाजिक कार्याला पसंती देत त्याप्रती वाहवयाच्या जबाबादारीचे भान स्विकारत त्या पद्धतीने काम केले. ते काम ह्यातभरही एखाद्या व्रतंस्थासारखेही पेलले. त्यामुळे फुले दांपात्यांच्या एनर्जीचा जवळपासही आपण फिरकू की नाही याबद्दल आपल्याला स्वतःच शंका यावी इतपत अंतर्गत पातळीवर जाऊन विचार करण्याची गरज असल्याची आवश्यकता क्षणोक्षणी जाणवत रहाते.
महात्मा फुले यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाल्यानंतर त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तो काळ (भारतातील) किंवा महात्मा फुले यांच्या हयातीचा काळ हा छपाईचे तंत्रज्ञान नुकतेच प्रगत होत असल्याचा तो काळ होता. महात्मा फुले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे गुरु मानत होते. त्याकाळी प्रत्येकाचे आत्मचरित्र आणि एखाद्या विषयावर सखोल अभ्यासाची पुस्तकेही तशी फारशी नव्हती. त्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात आणि त्यांच्या मुलाखतीतही काही वेळेस नमूद केले की, भारतातील राजकिय नेत्यांचा विचार करता, माझ्या इतकी गरिबी कोणत्याच राजकीय नेत्याने अनुभवली नसेल.
त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीत जन्माला आलेले. परंतु चातुवर्णानुसार महार ही जात शुद्र म्हणून ओळखली जात असल्याने सामाजिक समानता, आणि उच्चवर्णियांना जी वागणूक मिळते, तशी वागणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मिळेल याची कोणती शक्यताच नव्हती.
इतकेच नव्हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ३१ शैक्षणिक डिग्र्या त्यांच्या बुद्धीमुळे आणि अभ्यासाच्या जीवावार मिळवल्या, त्या शिक्षणासाठीही पारशी समाजातील नवल मथेना, छत्रपती शाहू महाराज आणि बडौदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची आर्थिक मदत मुख्य होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काळही काही फारसा बदलेला नव्हता. त्यामुळे महात्मा फुले यांच्या काळात ज्या पद्धतीची परिस्थिती होती, तशाच पद्धतीची धार्मिक-जातीय आधारित सामाजिक परिस्थिती होती.
इतकेच नव्हे तर डॉक्टरेट मिळविल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळविल्यानंतर बडौदा संस्थानात उच्च हुद्यावर ते नोकरीला लागले. परंतु त्या कार्यालयातही तेथील शिपायी त्यांना लांबून फाईल भिरकावून देत होता, तर पिण्यासाठी तर पाणी लांबच राहिले. पुणे कराराच्या वेळी राखीव मतदारसंघाच्या प्रश्नावरून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी मागे घ्यावी म्हणून आमरण उपोषण सुरु केले. त्यावेळी भारतातील सवर्ण पण काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्य़े आणि नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात मोर्च्ये काढण्यास सुरुवात केली. एकदा तर रात्री प्रवासादरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकरांना घेराव घालत राखीव जागांची मागणी सोडण्यासाठी दबाव आणला होता. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जमावासमोर माघार घेतली नाही.
त्यानंतर संसदेत हिंदू कोड बिल मांडण्यात आले. त्यावेळी तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर वैचारीक वाद घातला, त्याचवेळी संपूर्ण देशातील हिंदूत्वावाद विचारांच्या लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एकच मोहिम तेव्हाच्या प्रसारमाध्यमातून सुरु केली होती. तेव्हाचे व्यंगचित्रे, त्यांच्या विरोधातील इंग्रजी भाषेतील-स्थानिक भाषेतील लेख- यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होते.
परंतु आताच्या परिस्थितीत आपल्या शेजारच्याने तिसऱ्या व्यक्तीसमोर आपल्याबद्दल काही भाष्य केले तर आपल्यात नकळत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आणि आपल्या मनात नको-इतके विचार येतात आणि प्रसंगी टोकाचे पाऊल उचलण्याची मानसिकता निर्माण होते, किंवा या नकारात्मक परिस्थितीला सामोरे जाण्याबाबत कोणताच मार्ग आताच्या सोयीनुसार मिळत नाही. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर असोत की महात्मा फुले असोत यांची एनर्जी समजून घ्यायची असेल तर ती आधी यांची विचारधारा जी सामाजिक पद्धतीने कशी जात होती, त्याकडे पहावे लागेल, त्यानंतरच त्यांच्या एनर्जीला आपणास समजून घेता येईल आणि ते महान का झाले याचा त्यासाठी त्यांच्यात कोणती एनर्जी होती याचाही उलघडा निश्चित होईल.
लेखन-गिरिराज सावंत
sawant2001@yahoo.co.in
Marathi e-Batmya