सरकार स्थापनेचा प्रश्न आणि पवारांचे सूचक हास्य राजकिय संकेत की संभ्रमावस्था प्रश्न अनुत्तरीतच

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास २० दिवसांहून अधिकचा कालावधी झाला. मात्र सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपामध्ये निर्माण झालेला तिढा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचे सरकार याबाबतचा पेच अद्यापही सकृतदर्शनी सुटल्याचे दिसत नसले तरी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना याबाबत जेव्हा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवारांच्या हसण्याने याबाबतचा गुंता वाढताना दिसत आहे.
मागील २० दिवसात जवळपास १०० हून अधिकवेळा प्रत्येक पत्रकार परिषदांमध्ये मग ती नवी दिल्ली असो किंवा मुंबई आणि नागपूर येथील असो प्रत्येकवेळी शरद पवार यांनी शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. पण प्रत्येकवेळी सूचक हास्य करत पवारांनी याप्रश्नी उत्तर देण्याचे टाळलेच आहे.
त्याचबरोबर राज्यातील सत्ता स्थापनेचा प्रश्न हा भाजपा-शिवसेनेला विचारावा अशी सूचनाही त्यांनी अनेकवेळा प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना केली. भाजपाकडून भाजपा-शिवसेनेचे अर्थात युतीचे सरकार येणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले जाते. मात्र शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव येत नसल्याचे सांगत आमचे संख्याबळ जमत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. तरीही भाजपाकडून ना शिवसेनेकडून ना शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा केला जात नसल्याने पवारांच्या सूचक हास्याभोवतीचे गुढ वाढत चालल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.
पण पवार हे जेव्हा एखाद्या प्रश्नावर सूचक हास्य करतात तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर आणि त्यावरील राजकिय डावपेच त्यांच्या हातात असतात असे मत राजकिय नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून भाजपा अडकली स्वतःच्या जाळ्यात विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

“जर चाणक्य हयात असते, तर तुमच्या कपटाने तेही थक्क झाले असते,” अशा शब्दांत काँग्रेस खासदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *