टिपू सुलतान प्रकरणावरून राज्यात दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील भाजपा नेत्यांनी इतिहासाचा अभ्यास करुन बोलावे

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईतील मालाड मालवणी भागातील एका क्रीडासंकुलाच्या ‘वीर टिपू सुलतान क्रींडागण’ या नावावरून भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मुंबई व राज्यातील वातावरण बिघडवत आहे. भाजपा नेते राज पुरोहित यांचे राज्यात दंगली घडतील हे विधान गंभीर व भडकावू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक विद्वेष परवण्याचा भाजपा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

टिपू सुलतान नावावरून भारतीय जनता पक्ष धार्मिक रंग देऊन राज्यातील वातावरण बिघडवू पहात आहे. जीवघेणी महागाई, बरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यावर केंद्रातील भाजपा सरकार अपयशी ठरले असून या मुख्य मुद्द्यांना बगल देऊन पाकिस्तान, मंदिर, मशिद, धर्म संसदेच्या माध्यमातून धार्मिक मुद्दे चर्चेत आणून भाजपा राजकारण करत आहे. मुंबईत टिपू सुलतानच्या विषयावरून वातावरण पेटवून त्याचा निवडणुकीत फायदा उचलण्याचे हे षडयंत्र आहे. परंतु भाजपाने धार्मिक मुद्दे सोडून निवडणुका लढवून दाखवाव्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून दोन वर्षात सरकारने केलेल्या कामामुळे जनतेचा विश्वास वाढत असून भाजपाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्यासाठी टिपू सुलतानच्या नावावरून धार्मिक द्वेष पसरवून अशांतता पसरवण्याचा भाजपा प्रयत्न दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

टिपू सुलतानबद्दल कोणाला जास्त प्रेम आहे हे राज्यातील भाजपा नेत्यांनी कर्नाटकातील त्यांच्या नेत्यांकडून माहिती घ्यावी. कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतानचा गौरव करण्यात आला त्यावेळी भाजपाचेच सरकार होते. त्यामुळे आधी भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी अभ्यास करावा व नंतर बोलावे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, येथे भडकावू विधाने करुन राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करत असेल तर महाविकास आघाडीचे सरकार त्याची गंभीर दखल घेईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.    

टिपू सुलतानप्रकरणी काल भाजपा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर आज त्यास पुन्हा वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपाच्या नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना आज आव्हान दिले. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *