Breaking News

कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना तातडीने निलंबित करा काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

राज्यातील कल्याण निधी भरणाऱ्या ४ कोटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना गुणांना वाव देण्यासोबतच त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरिता विविधांगी कल्याणकारी उपक्रम, योजना राबवण्याकरिता कामगार कल्याण मंडळाची निर्मिती झाली आहे. परंतु मंत्रालयातील कामगार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हाताशी धरून कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचे आरोप शासनस्तरावर होत आहेत. मंडळामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची गंभीर्याने दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या निलंबनाची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी कल्याण निधीचा केलेला अपव्यय, गैरकारभार आणि कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात महाराष्ट्र काँगेस प्रदेश कमिटी, ग्राहक संरक्षण सेलचे, सचिव रफिक मुलाणी यांनी सक्षम पुराव्यासह तक्रार शासनाकडे केली आहे. मंडळामध्ये कल्याण आयुक्त पदी रुजू झाल्यापासून रविराज इळवे यांनी आर्थिक हित साधण्यासाठी मंडळातील दुरुस्त्या,बांधकाम आणि पाडकाम सार्वजनिक बांधकाम विभागास न देता मंडळातील आतांत्रिक असलेले प्रसिद्धी अधिकारी मनोज बागले यांच्याकडून बेकायदेशीर करून घेण्यात आले आहेत. तसेच ठेकेदारांना कामे देताना निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या नाहीत. तसेच दुरुस्ती आणि बांधकामाची कोट्यावधी रुपयांचे ठेके हे ठराविक आणि आर्थिक हित साधणाऱ्या ठेकेदारांना देण्यात आले. मंडळाचे मुखपत्र असलेले श्रमकल्याण युग त्रैमासिक कामगारांचा प्रतिसाद नसल्याने ८ वर्षांपासून बंद होते. परंतु इळवे यांनी सदर मुखपत्र मासिकेत रुपांतरीत करून कोट्यावधी रुपयांचा कल्याण निधी मासिकेच्या छपाईसाठी उधळला. तसेच श्रमकल्याण युग मासिकेचे लिखाण करण्यासाठी मंडळामध्ये जनसंपर्क आणि प्रसिद्धी अधिकारी उपलब्ध असताना खासगी संस्थेस लिखाण लिहिण्यासाठी मोठया प्रमाणात कल्याण निधी खर्च करण्यात आला. मंडळाने ऑनलाईन प्रणाली राबवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असताना आणि देशात डिजिटल युग आले असताना कोट्यावधी रुपये मासिकेच्या छपाईसाठी खर्च करण्याचा घाट रविराज इळवे यांनी घातला आहे. मासिकेसाठी वर्गणी भरणाऱ्या बहुसंख्य कामगारांना मासिक प्राप्त होत नसल्याच्याही अनेक तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. मंडळामध्ये पुणे, जलतरण तलावाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमामध्ये २६७४ खासगी सभासदांना प्रवेश देण्यात आले असून केवळ १८९ कामगारांना उपक्रमामध्ये सहभागी करण्यात आले. ठेकेदारांकडून आर्थिक नफा कमावण्यासाठी नाममात्र कामगारांना प्रवेश देण्यात येत असल्याने कल्याण आयुक्त इळवे यांच्या अधिपत्याखाली मंडळ हे कामगारांच्या कल्याणासाठी राहिले नसल्याची भावना कर्मचारी वर्गात होत आहे.

मंडळातीलच सहाय्यक कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्यासंदर्भातील बोगस नियुक्ती आणि भ्रष्टाचार प्रकरणी कामगार सचिवांनी आजवर तायडे यांची साधी चौकशी न करता विधासभा सदस्यांच्या लक्षवेधी सुचनेस खोटे उत्तर दिल्याची बाब कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणुन तायडे यांनादेखील निलंबित करून

चौकशी करण्याची मागणी केली आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कामगार विभागावर नियंत्रण नसून कामगार सचिव विनिता वेद सिंघल या मंडळातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मंडळाचे माजी सदस्य तथा म.कॉ.प्र. क. ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष नितीन भाऊराव पाटील यांनी केला आहे. तसेच रविराज इळवे यांना निलंबीत करून चौकशी न केल्यास कामगार सचिव विनिता वेद सिंघल यांच्याविरोधात राज्यभर नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन भाऊराव पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत