छगन भुजबळ नाराज नाहीत ? राज्यसभेच्या उमेदवारी वरून व्यक्त केली अप्रत्यक्ष नाराजी

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या हालचाली मागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय अट आणि महायुतीतील सत्तासमीकरणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर छगन भुजबळ आपण नाराज नाही प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले राज्यसभा किंवा लोकसभा असेल, चार-पाच वेळा आलेल्या संधी दुर्दैवानी हाती लागल्या नाहीत. यावेळी वाटलं होतं की जाऊ. अनेक ठिकाणी मुलं मंत्री किंवा खासदार आहेत. मकरंद पाटील, सुनेत्रा पवार, शिंदे साहेब, तटकरेंचं तसं आहे. म्हणून मलासुद्धा वाटलं की, मुलाला मंत्रिपद द्या आणि मी राज्यसभेवर जातो. मला वाटतं की वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असेल, याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडे प्रस्ताव मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आणि एका दिवसामध्ये त्यांचे असे उत्तर आले की, ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी विचार करू. म्हणूनच भाजपाने नकार दिला या बातमीत काहीही तथ्य नाही. मी नाराज वगैरे काही नाही. इतर नेते जसे वर किंवा खाली मंत्री वा खासदार आहेत, सोबतच त्यांची मुलंही मंत्रिपदी किंवा वर लोकसभा, राज्यसभेत आहेत, तसाच न्याय मला मिळावा अशी माझी मागणी होती.असे भुडबळ म्हणाले.

यावर मग आता अन्याय झालाय का? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, चालायचंच, मी काही बुद्धिबळाचा खेळाडू नाही, मी कबड्डीचा खेळाडू आहे. असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. महायुतीमध्ये आधीच मंत्रिपदांसाठी मोठी स्पर्धा आहे. भाजप, शिंदेशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) या तिन्ही पक्षांतील अनेक नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत समीर भुजबळ यांना थेट मंत्रिमंडळात घेण्यास भाजप नेतृत्व तयार नव्हते, असे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, समीर भुजबळ यांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने छगन भुजबळ राज्यसभा उमेदवारीबाबत उत्सुक राहिले नाहीत. परिणामी, पक्षाने पर्यायी नावाचा विचार सुरू केला. त्याचवेळी उद्योगपती आणि राष्ट्रवादीशी जवळीक असलेले राजेंद्र जैन यांचे नाव पुढे आले आणि अखेरीस त्यांची उमेदवारी निश्चित झाली. राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांच्या अधिक जवळचे आहेत. त्यांचे नाव सुरुवातीच्या चर्चेत फारसे नव्हते. मात्र, भुजबळांचे नाव मागे पडताच पक्ष नेतृत्वाने तुलनेने वादमुक्त आणि सर्वमान्य चेहरा शोधण्याचा प्रयत्न केला.

छगन भुजबळ हे राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांपैकी एक मानले जातात. अलीकडेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अशा वेळी त्यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने ओबीसी समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, याची काळजी महायुतीला घ्यावी लागणार आहे.

About Editor

Check Also

अनंत गाडगीळ यांचा सवाल, आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय जाहीर कसे केले ?

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांची ‘कर्जमाफी’ व नाशिकच्या कुंभमेळाव्यानिमित्त तपोवनासाठी आर्थिक तरतूद या गोष्टींना आमचा आक्षेप नाही. परंतु, महाराष्ट्रात सध्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *