लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम राबविताना पक्षपातीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. एसआयआर (SIR) मोहिम राबविताना काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात पुढील तीन-चार वर्षात कोणत्याच निवडणुका नाहीत, त्यामुळे मुंबईत एसआयआर (SIR) मोहिम राबविताना घाईघाईत न करता त्यासाठी वेळ द्यावा तसेच एसआरआर मोहिम निष्पक्षपातीपणे राबवावी, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, लोकशाही व्यवस्थेत संविधानाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. मतदानाचा हक्क बजवाण्यासाठी मतदारयाद्या अद्ययावत असल्या पाहिजे परंतु मतदारयाद्या अद्ययावत करण्याच्या SIR मोहिमेत मात्र अनेक दोष दिसून आले आहेत. आतापर्यंत देशाच्या अनेक राज्यात राबवण्यात आलेल्या या मोहिमेवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत, तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मतदारांचे नाव योग्य त्या कागदपत्रासह नोंदणी करणे हे जसे मतदाराचे कर्तव्य आहे तसेच एखाद्या नागरिकाचे नाव मतदार यादीतून का वगळले ते जाणून घेण्याचा अधिकारही त्यांना आहे. विशेषतः एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीने ही मोहिम राबविली जात असल्याची आम्हाला शंका आहे. निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष जेव्हा काही तक्रारी, हरकरी, सुचना घेऊन येतो तेव्हा त्याची योग्य ती दखल घेतली पाहिजे. सुदृढ व निकोप लोकशाही ते अत्यंत गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एखाद्या मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी त्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी किमान सात दिवसांची नोटीस द्यावी. एसआयआर (SIR) प्रक्रियेसाठी प्रत्येक बूथ पातळीवर राजकीय पक्षांच्या एजंट्सची नोंदणी करावी. प्रत्येक बूथवरील सर्व मतदारांची पडताळणी संबंधित BLO कडून केली जावी.Garuda अॅपमधील नोंदी पुरावा म्हणून जतन कराव्यात. संपूर्ण SIR प्रक्रियेचा डेटा किमान पाच वर्षे जतन करावा. तसेच राजकीय पक्षांना हा डेटा उपलब्ध करून द्यावा. नमुना ७ अर्जाचा दुरुपयोग होणार नाही खबरदारी घ्यावी. एएसडी (ASD) म्हणून चिन्हांकित मतदारांची यादी राजकीय पक्षांच्या ‘बूथ लेव्हल एजंट्स’ना लगेच द्यावी. प्रारूप यादीत वगळण्यासाठी निश्चित केलेल्या सर्व मतदारांची यादी CSV/Excel फॉरमॅटमध्ये ४८ तासांच्या आत राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्यावी.इतर राज्यात एस.आय.आर. (SIR) राबविताना झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करु नये. ऑनलाईन पध्दतीतून मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसवण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आली आहेत, तसे पुन्हा होऊ नये असे आवाहनही यावेळी केले.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना एसआयआर (SIR) च्या संदर्भातील सॉफ्ट कॉपी, OCR किंवा मशीन रिडेबल स्वरूपात द्याव्यात. एस.आय.आर. (SIR) राबविताना नागरिकांना वा राजकीय पक्षांना आक्षेप नोंदविण्यासाठीचा कालावधी किमान एक महिना करावा. मतदार याद्या विशेष सखोल पुनर्रिक्षण मोहिम मुंबई परिसरातील पुनर्विकासासाठी निष्कासित इमारती, चाळी व झोपडपट्टी मधील रहिवाशांना/मतदारांना विशेष बाब म्हणून गणना प्रपत्र सादरीकरणाची व्यवस्था करावी. मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते लवकर पूर्ण करावे व मॅपिंगचा डेटा देण्यात यावा. मुंबईत आपल्या मार्फत अद्याप BLO च्या नियुक्त्या झालेल्या नाहीत त्या तत्काळ करण्यात याव्या. Returning ऑफिसर पूर्ण वेळ असावे. BLA 1 आणि BLA 2 यांना ओळखपत्र देण्यात यावे. सर्व पात्र तरुणांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी मतदार नोंदणी पोर्टल आणि सॉफ्टवेअर त्वरित अद्ययावत करावे. ऑफलाइन अर्ज (फॉर्म-६) स्वीकारण्याबाबत बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) आणि तळागाळातील संबंधित अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाव्यात. आपण जाहिर केलेल्या एसआयआर चा दुसरा टप्पा दि. ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत होत आहे. या कालावधीमध्ये म्हणजेच जुलै २०२६ मध्ये मुंबई व परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, याचा विचार करुन विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रम (SIR) या कालावधीमध्ये न राबवता पुढे ढकलावा अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya