अखेर मुंबई विद्यापीठाला मिळाला नवा कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात झालेला गोंधळ आणि त्यात विद्यापीठ प्रशासनाचा गलथानपणा आदी गोष्टींमुळे माजी कुलगुरू संजय देशमुख यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. त्यामुळे देशमुखांना निरोप देत नव्या कुलगुरूचा शोध घेण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला देत त्याकरीता नवी समितीही स्थापन केली. अखेर दोन-तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या समितीला नवा कुलगुरू मिळाला आणि त्याची माहिती या समितीने राज्यपालांना दिली. त्यानुसार रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दिनांक २७) डॉ पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.

डॉ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी डॉ संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ  देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ श्यामलाल सोनी, संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड व भूषण गगराणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको हे समितीचे अन्य सदस्य होते.

About Editor

Check Also

माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार

मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *