​उद्धव ठाकरे यांचा निर्धार, …विधानसभा निवडणूकीत १८० ते १८५ जागा जिंकणार संघटनात्मक बांधणीवर भर द्या!

लोकसभा निवडणूका नुकत्याच होऊन केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थानापन्न झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूका येऊ घातल्या असून त्यासाठी आणखी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून २८८ मतदार संघात संघटनात्मक बांधणी करून ताकदीने कामाला लागा, अशा आदेश शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांना​ दिल्याची माहिती ​खासदार संजय राऊत यांनी ​दिली.

सोमवारी विधानसभा निवडणूकीची रणनिती ठरवण्यासाठी दादर येथील शिवसेना भवनात​ उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निका​लावर मंथन आणि येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेण्यात आला.

​या बैठकीला शिवसेना उबाठा गटाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अनिल परब आदी नेते आणि राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने ​यावेळी उपस्थित होते​.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागा जिंकल्या. राज्यात मिशन ४५ ठेवलेल्या महाविकास आघाडीने महायुतीला रोखले. केंद्रात नरेंद्र मोदींचे बहुमत कमी करण्यात राज्य आणि महाविकास आघाडीचे मोठे योगदान आहे. आता पाच महिन्यांनी विधानसभा निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आढावा बैठकीत, लोकसभा निवडणुकीबाबत मंथन आणि येत्या विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा केल्याची माहिती बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माहिती दिली.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. यावेळी संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने आणि विधानसभेच्या दृष्टीने पूर्व तयारीवर भर देण्यात आला. त्यानुसार २८८ मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीबाबत रणनिती आखण्यात आली. आता पावसाळा सुरू झाल्याने जाहीर सभांऐवजी राज्यभरात इनडोअर मेळावा किंवा बैठका घेतल्या जातील, असेही सांगितले.

पुढए बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सोबत शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या भागात पदाधिकाऱ्यांनी जोर लावावा. येणाऱ्या विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने अधिक ताकदीने आणि मजबुतीने संघटनात्मक बांधणी करावी. आघाडीत वाट्याला येणाऱ्या जागा लढू या. लोकसभेत फटका बसलेल्या जागांवर पुन्हा मतांचा टक्का वाढवा. सर्वाधिक उमेदवार जिंकून या निवडणुकीत येतील, यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी १८० ते १८५ जागा जिंकू, असा निर्धार ही शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आल्याचेही सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची इंधन तुटवड्यावरून केंद्र सरकारवर टीका पेट्रोलियम क्षेत्रात एस्मा ESMA लागू

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात केंद्र सरकारने एस्मा ESMA लागू केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *