विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत काँग्रेसची १० सदस्यीय समिती स्थापन महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करणार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चेला महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने १० सदस्यांची समिती स्थापन केली. त्यापैकी ३ सदस्य मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. या समितीचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागा काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विभागल्या जाणार आहेत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील पक्षांची प्राथमिक स्तरावर बोलणी झाली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशानुसार पक्षाने महाविकास आघाडीतील जागा वाटपासाठी १० सदस्यांची समिती स्थापन केली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, नितीन राऊत, सतेज पाटील यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील जागा वाटपाच्या समितीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांची जागावाटपाच्या समितीत समावेश करण्यात आला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांना समितीत स्थान नाही

विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय युवा चेहरा विश्वजित कदम यांना या समितीत स्थान मिळालेले नाही. २३ जुलै रोजी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रदेश काँग्रेस संघटनेत कोणताही बदल होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आला.

नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले के सी वेणुगोपाल यांनी महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांसह महाराष्ट्र काँग्रेस महायुतीचा जोरदार मुकाबला करेल, असे सांगितले होते. तसेच, लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा सफाया झाला आहे. आता महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असून तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर कारवाई करण्याचे संकेतही के सी वेणुगोपाल यांनी दिले होते. पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही के सी वेणूगोपाल यांनी दिला होता. मात्र आजपर्यंत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

About Editor

Check Also

रविंद्र चव्हाण यांचा इशारा, भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई भाजपामधून फुटून सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणा-या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *