अजित पवार यांची वाचाळवीरांना तंबी, योजनेसाठी महायुतीलाच मतदान करा सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या राहुल गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज काँग्रेस पक्षाकडून सत्तातारी भाजपा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना थेट तंबी दिली. तसेच आवाहन केले की, हा महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे राजकारणातील वाचाळवीरांनी विरोधकांवर टीका करताना जरा शब्द जपून वापरावे असे सांगत तंबी देत अन्यथा एक दिवस मुख्यमंत्री शिंदे यांना अडचणीत आणाल असा इशारा दिला. तसेच विरोधी पक्षाचे नेते कितीही योजना बंद होणार असल्याचे सांगत असले तरी ही योजना बंद करणार नसून त्यासाठी नुकतेच ४ हजार ५०० कोटी रूपयांच्या चेकवर सही करून आलो असल्याचे सांगत तुम्हाला जर वाटत असेल की योजना बंद होऊ नये तर महायुतीतील पक्षांना मतदान करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी बुलढाणा आयोजित लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना रक्कम देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यावेळी बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी वाचाळवीरांनी असेच वक्तव्य करत राहिले तर लवकरच आपल्याला विरोधात बसण्याची तयारी करावी लागेल असे सांगत ही योजना बंद होऊ देणार नसल्याचे सांगत त्याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने देत असल्याचेही यावेळी सांगितले.

ऐरवी भाजपा प्रणित महायुतीच्या मंचावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीही फुले-शाहु-आंबेडकरांचा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या संस्काराचा उल्लेख केला जात नाही. मात्र अजित पवार यांनी या सर्वांची नावे घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरील राजकिय युतीत विचारांचा एकोपा नसल्याचे आणि अनैसर्गिक युती असल्याची बाब उपस्थित जनसमुदायाला जाणवली.

दरम्यान, लाडकी बहिण योजनेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, असे यावेळी स्पष्ट केले.

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा महिलाभगिनींच्या उपस्थितीत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे – पाटील, आमदार सर्वश्री किरण सरनाईक, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमूलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलाभगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना व्यापकपणे व गतीने राबविण्यात आली. विक्रमी कमी वेळेत पैसे खात्यात येण्याची ही योजना ठरली आहे. शासनाने ३३ हजार कोटी रुपये या योजनेसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही. योजनेत मिळणा-या रकमेमुळे गरीबांना निश्चित मदत होत आहे. यापुढेही आम्ही ही रक्कम वाढवत जाऊ, अशी ग्वाहीही यावेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुलींना मोफत शिक्षण, लेक लाडकी, लखपती दीदी, अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, किसान सन्मान योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा योजनांमुळे महिलांना व कुटुंबांना बळ मिळत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे जाळे निर्माण होत आहे. अधिकाधिक बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

एक कोटी भगिनींना लखपती बनविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आर्थिक विकासाच्या प्रवाहात महिलांना आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीसारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्यातही १ कोटी महिलाभगिनींना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. राज्यात भगिनींसाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना, एसटी प्रवास सवलत, मोफत शिक्षण अशा योजनांबरोबरच लाडक्या भावांसाठीही युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पीक विमा, सौर वीज अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाने जिगाव प्रकल्प पूर्णत्वास नेला असून, वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप, तसेच लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. बुलढाणा जिल्हा प्रशासनातर्फे प्रकाशित जिल्हा कॉफीटेबल बुक आणि ‘राजमाता’ बोधचिन्हाचे अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे, तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. आमदार संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

समारंभात जिल्ह्याच्या कानाकोप-यातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर महिलाभगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात व मोबाईल टॉर्च उंचावून त्यांचे जोरदार स्वागत केले. लाडक्या बहिणींचे अभिवादन स्वीकारत मान्यवरांनी मंचावर प्रवेश केला. यावेळी अनेक भगिनींनी मान्यवरांना राख्या बांधल्या व त्यांच्यासमवेत सेल्फीही घेतली. मान्यवरांनीही सर्वांचे अभिवादन स्वीकारत त्यांच्याशी संवाद साधला.

About Editor

Check Also

लक्ष्मीदर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार घटनात्मक पदावर बसलेल्या विधान सभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य, महाविकास आघाडीची टीका

राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *