शरद पवार म्हणाले, बोर्ड वाचला मलिदा गँग संपवा… जावई कुणाचा हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी शरद पवार यांचे सूचक विधान

माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं. त्याच हेतून माझं लक्ष इंदापूरकडे होत. जाणून बुजून विचारपूर्वक इंदापूरच्या एका सहकार्याला प्रोत्साहन करण्याचं काम केलं, चेअरमन केलं, जिल्हा परिषदेचे प्रमुख केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले, मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह केला. त्याच्यामध्ये हेतू होता की इंदापूर तालुक्याचा दुष्काळ असेल, इथली कारखानदारीची वाढ असेल त्यासाठी काम करणारा कोणी सहकारी असला पाहिजे आणि त्या हेतूने हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती पण इथं आल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जे जे मी ऐकतोय माझ्यासारख्यालासुद्धा धक्का बसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले.

इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी आता इथे बोर्ड वाचत होतो आणि त्या बोर्डावर लिहिलं होतं मलिदा गँग संपवा. मी बारामतीला ऐकतो मलिदा गँग आणि इथली सुद्धा गॅंग आहे हे अलीकडे कळायला लागल होत. ते तुम्ही कुणी सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मी अनेक वर्ष काम केलं जवळपास ५५ वर्ष मी कुठल्या ना कुठल्यातरी पदावर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या ओळखी चांगल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्या बरोबर, माझ्या हाताखाली काम केलं. कधी भेटतात. सहज मी चौकशी करतो. आमच्या जिल्ह्याच कसं आहे? ते सांगतात, कि ते जुने दिवस राहिले नाहीत. म्हटलं काय झालं? कुठल, कशाचं काय सांगताय? ते म्हणाले इंदापूर तालुका, भाऊंच्या सारखा नेता त्यांचे व्यवहार कुठं आणि हल्लीच्यांचे व्यवहार कुठं याची चर्चा न केलेली बरी हे अधिकारी सांगायला लागले. इतका बदलौकिक, इतके चुकीचे विचार, इतकी चुकीची माहिती कधीही या भागातल्या नेतृत्वाच्या बद्दल आलेली नव्हती. दुर्दैवाने ती आलेली आहे. ते चित्र बदलायचे असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवा असेल तर कर्तृत्वान अशा प्रकारची कुवत असलेला नेता पाहिजे. आज हर्षवर्धनच्या निर्णयाने ही पोकळी भरून निघेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही एकत्र अनेक ठिकाणी काम करतो पक्ष वेगळा होता. माझा पक्ष वेगळा होता. पण महाराष्ट्राच्या या देशाच्या शेतकऱ्यांसाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो. वसंतदादा साखर धंद्याची संस्था मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मॅनिजिंगमध्ये हर्षवर्धन आहेत, आम्ही भेटत होतो. पक्ष वेगळा होता पण या सगळ्या कालखंडामध्ये एकदा सुद्धा धोरणांबद्दल कधीही मतभेद नव्हते. एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या आणि त्यांच्या विचारात कधीही फरक पडला नाही. ज्या-ज्या वेळेला नवीन काही करायचं असेल तर ज्या दोन-तीन सहकाऱ्यांवर जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची त्यातील पहिले नाव हर्षवर्धनचे यायचे असेही यावेळी आवर्जून सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, अलीकडच्या काळात आणखी एक चांगली गोष्ट झाली. सर्व उसाचा धंदा, साखरेचा धंदा, इथेनॉल गेले २५ वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. केंद्र सरकारमध्ये ती जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही सर्वजण एकत्रपणाने करत होतो. मोदी साहेबांचं हे सरकार आलं थोडी स्थिती बदलली. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही जे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती. जेव्हा आम्हाला काळजी वाटायची की, ऊस उत्पादकांचे काय होणार? साखरेच्या किमतीचे काय होणार? उसाच्या टनाला किंमत किती मिळणार? त्याचे काय होणार? नवीन धोरणं, नवीन प्रकल्प हातामध्ये घेतलंय त्याचे काय होणार? पण या संकटातून आम्हा सगळ्यांना आणि या महाराष्ट्राला काढायचं काम, दूर करण्याचे काम हर्षवर्धनने केलं. या देशामध्ये २५० पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. हे सगळे साखर कारखाने सहकाराचे त्याचे देशाचे नेतृत्व हर्षवर्धनकडे असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्ष वेगळा होता पण आम्ही नेहमी सांगायचो चिंता करू नका आपला माणूस तिथे आहे, हर्षवर्धन तिथे आहे. त्यामुळे या संबंधीची कुठलीही अडचण आली तर आम्ही एकमेकांशी बोलत असायचो, त्यातून मार्ग काढत असु एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्टकरी बळीराजाच्या हिताची जपणूक करणे हेच आपले महत्त्वाचे काम आहे. हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्याला माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला. मला आनंद आहे की त्यांचं मन इथे होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदापूर पुरता नाही तर सबंध ऊसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाजकारणाला शक्ती देणारा अशाप्रकारचा हा निर्णय असल्याचेही यावेळी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, चित्र बदलतंय, आज हा कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला आज इंदापूरलाच आला आहात १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे? म्हणे इंदापूरला आहे तोच आमच्याकडे. मी विचारलं कुठे? म्हटले फलटणला. समजलं का? मग आता याच्यानंतर फलटण. फलटण झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस बुक झालेत. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे सबंध हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रात आलेली असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले, काही लोक मला विचारत होते की कसं होणार? काय होणार? म्हटलं काही काळजी करू नका. जावई कोणाचा आहे? कोणालाही पोरगी आम्ही देत नसतो. आम्ही चांगलं घर बघूनच मुलींना देत असतो, त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालंय. संसार नीट साजरा करा तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे. हे बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता. आज त्या जावईचं या ठिकाणी स्वागत करणं हे स्वाभिमानाचं समजतो असे सांगत शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *