हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाल्यानंतर भाजपाच्या कार्यालयाबाहेर आज विजयी मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत मिठाई वाटण्यात आले. हरियाणात अपेक्षा नसतानाही भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी ठरली. मात्र हरियाणातील भाजपाचा फॉम्युला जम्मू आणि काश्मीर राज्यात यशस्वी ठरू शकला नाही. मात्र बऱ्यापैकी जम्मूमधील विधानसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यात भाजपाला यश मिळाले.
हरियाणातील विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही या विजयी मेळाव्यात सहभागी झाली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरात कोणत्याही पक्षाचे सरकार विजयी होवो. पण ते भारतीयांचा पक्ष असून पाकिस्ताने केलेल्या आरोपाला जम्मू आणि काश्मीरमधील भारतीयांनी पाकिस्तानला दिलेले ते उत्तर आहे. केंद्रात भाजपाचे सरकार असून सुद्धा जम्मू आणि काश्मीरमध्ये निर्भयी आणि निश्पक्ष वातावरणात निवडणूका घेऊन दाखविल्या. या निवडणूकांची पाहणी करण्यासासाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळाने देखील या निवडणूक आयोजनाचे कौतुक केल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणूकीनंतर देशातील दोन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत पहिली सलामी हरियाणाने दिली आहे. मात्र दुसरी सलामी महाराष्ट्र देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावाही यावेळी केला.
यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हरियाणामध्ये भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार, महायुतीचा प्रचंड विजय होणार असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हरियाणामध्ये भाजपाची सत्ता स्थापन होत आहे. जम्मू – काश्मीरमध्येही भाजपाला मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली होती. मात्र आता विरोधकांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. मोदी सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देत जनतेने भरभरून भाजपाच्या पारड्यात मतदान केले म्हणून हरियाणा, जम्मू – काश्मीरमध्ये इतके मोठे यश मिळाले असल्याचे सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांचे अमेरिकेतील आरक्षणाबाबतचे वक्तव्य ऐकल्यानंतर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला आहे. जीविताचे, मालमत्तेचे तसेच संविधानाचे रक्षण केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणार आहेत. राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मतदारही महायुतीला विजय प्राप्त करून देतील. विरोधकांचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रामध्ये हाणून पाडण्यासाठी ‘भाजपा घर चलो अभियान’ राबविणार आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचून काँग्रेसने निर्माण केलेला संभ्रम दूर करून राज्य आणि केंद्र सरकारची विकासकार्ये पोहोचवेल. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण हद्दपार करून सर्व समाजांना एकत्र ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहील. आत्मपरिक्षणाची वेळ आता काँग्रेसवर आली आहे. भाजपाला विजयाचा उन्माद नाही की पराजयाने आम्ही खचत नाही. अंत्योदयाच्या भावनेने भाजपा सतत कार्य करत असल्याचेही यावेळी सांगितले.
हा केवळ ढोलाचा नाद नाही तर भाजपाच्या विजयाची सिंहगर्जना आहे.#HaryanaAssemblyElection2024 pic.twitter.com/Hvm6kqsQZx
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2024
Marathi e-Batmya