अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता भाजपा आणि शिंदे सेनेपासून धोका राष्ट्रवादीच्या जागा पडल्या तरी भाजपा आणि शिंदे सेनेला दुःख नाही

अजित पवार यांचे महायुतीतील स्थान एकाकी होत चालले आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी (अजित गट) ला आता त्यांच्याच मित्रपक्ष भाजपा आणि शिंदे सेनेकडून सर्वात मोठा धोका आहे. याचे कारण ज्युनियर पवार यांनी नवाब मलिक यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे. आश्वासनानुसार अजित पवार यांनी नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार केले असून नवाब मलिक यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे तगडे नेते आणि विद्यमान आमदार आहेत. पण जमीन खरेदी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी नवाब मलिकचे संबंध असल्याचा आरोप भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटकही झाली होती. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. सध्या ते प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा उघडला असून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही ही कोंडी सोडवता आली नाही. सर्वांच्या विरोधाला न जुमानता नवाब मलिक उमेदवार झाल्यामुळे महायुतीत देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होणार असल्याची चर्चा आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. यावर भाजपाचे प्रवक्ते प्रतिक्रिया देतील असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

मात्र विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात कागदपत्रे गोळा करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांचा पराभव करण्यासाठी भाजपा समर्थकांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. आता भाजपासोबतच ज्युनियर पवार यांच्याविरोधात शिंदे सेनेनेही मोर्चेबांधणी केली आहे. अजित पवार गटाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी भाजपा आणि शिंदे सेना एकत्र कामाला लागल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या विरोधात लढणाऱ्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म पाठवण्यासाठी शिंदे सेनेने हेलिकॉप्टरची सेवा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दिंडोरी येथील धनराज महाले व देवळाली येथील राजश्री अहिरराव या शिंदे सेनेचे उमेदवार असून त्यांच्यासाठी एबी फॉर्म पाठविण्यात आले होते. हे दोघेही अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ (दिंडोरी) आणि सरोज अहिरे (देवळाली) यांच्याशी लढत देत आहेत. किमान डझनभर जागांवर भाजपा आणि शिंदे सेनेचे उमेदवार अजित पवार गटाचे नुकसान करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली असून त्यातच बारामतीच्या जागेवर अजित पवार यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *