रामदेव बाबांच्या पतंजलीची कोट्यावधी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली

महसूल विभागाकडून लवकरच अंतिम निर्णय होणार

मुंबई : प्रतिनिधी

नागपूर येथील मिहान प्रकल्पात सवलतीच्या दरात रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला स्वस्त दरात जमिन दिल्यानंतर जमिनीच्या येणेसाठी भरावी लागणारी साडेतीन कोटी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याची धक्कादायक माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अतिविशेष औद्योगिक प्रकल्प म्हणून मिहान प्रकल्प सुरु करण्यात आला. याप्रकल्पाच्या माध्यमातून निर्यातक्षम करू शकतील अशाच कंपन्यांना जमिन देण्याचे धोरण राज्य आणि केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आले. मात्र या प्रकल्पात रामदेव बाबांनी त्यांच्या पतंजली कंपनीकरीता जमिनीची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने त्यांना सवलतीच्या दरात ४०० एकर जमिन प्रदान केली. या जमिनीच्या वापरासाठी जमिनीचे रूपांतरण अकृषिकमध्ये करण्यासाठी महसूल विभागाच्या परिपत्रकानुसार अकृषिक कर अर्थात स्टँम्प ड्युटी भरणे कमप्राप्त आहे. त्यानुसार महसूल विभागाकडून ३ कोटी ५० लाख रूपयांचा अकृषिक कर भरण्यास पतंजलीला कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र पतंजलीने स्टँम्प ड्युटीची रक्कम भरण्याऐवजी सदर रकमेची माफी मिळावी अशी मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाकडून स्टँम्प ड्युटी माफ करण्याचा प्रस्ताव तात्काळ महसूल विभागाला पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावानुसार निर्णय घेण्यासाठी महसूल विभागाने पतंजली कंपनीस स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत महसूल मंत्री विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.    

About Editor

Check Also

निवडणूक आयोगाकडून फाल्टा मतदारसंघात फेरमतदान निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचा भंग झाल्याने पुर्नमतदान

भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *