हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?

महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर त्यांनी सरकारच भिकारी आहे हे सांगून असंवेदनशीलतेचा कळस केला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवण्याची गरज नाही पण मुख्यमंत्री त्याला का पाठिशी घालत आहेत? कोकाटेंची हकालपट्टी करण्याची फडणवीस यांच्यात हिम्मत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, कोकाटे हे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमासह समाज माध्यमांवरही सर्वांनी पाहिले आहेत. शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याचा निर्णय होत नाही, राज्याच्या काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा अनेक संकटाचा सामना शेतकरी करत असताना त्याकडे कोकाटे गांभिर्याने पहात नाहीत असेच त्यांच्या कामावरून व बेताल वक्तव्यावरून दिसत आहे. शेतकऱ्याला भिकारी म्हणालो नाही तर ‘सरकारच भिकारी आहे’, राजीनामा दयायला मी काय विनयभंग केला आहे का? अशी मुक्ताफळे उधळून हे महाशय आपण काहीच चुकलो नाही असे बिनधास्त सांगत आहेत. हा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते जुमानत नाहीत असे त्यांच्या विधानांवरून दिसत आहे. अशा मुजोर मंत्र्याला तात्काळ घरचा रस्ता दाखवला पाहिजे पण तसे होत नाही हे पाहता फडणवीस यांची काही तरी मजबुरी असेल म्हणून ते कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. कारण काहीही असो अशा व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जातो त्याची तरी काळजी करा, असे सपकाळ म्हणाले.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सातत्याने वादग्रस्त विधाने करून माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची प्रतिमा मलीन केली आहे. अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे राज्याच्या व शेतकऱ्याच्या हिताचे नाही. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण हे चिंताजनक असून महाराष्ट्राला ते भूषणावह नाही, त्यामुळे कोकाटेंचा तातडीने बंदोबस्त करा व नारळ देऊन घरी पाठवा, अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापनासाठी एआय आधारित ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करा एआय आधारित एकात्मिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणार

राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *