भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी याप्रकरणी एफआयआरही दाखल केला, त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघात मतचोरी कशी करण्यात आली हे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता मतचोरीचा आणखी एक बॉम्ब राहुल गांधी यांनी फोडला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाच्या मतदारयादीत कसा घोटाळा केला? हे आज उघड केले. निवडणूक आयोग दुटप्पीपणा करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरीवर स्पष्ट उत्तर न देता राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे बोलत आहेत. मतचोरी करून भाजपा व नरेंद्र मोदी यांना भारताचा नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश करायचा आहे, असा गंभीर आरोपही केला.
जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींचा विजय..
हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार केंद्र सरकारची पोलखोल केली असून नोटबंदी, कोरोना संकटावरही त्यांनी मोदी सरकारला धोक्याचा इशारा दिला होता. पण मोदी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली. जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी ८ वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि जीएसटीमध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. जीएसटीमधील सुधारणा हा राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी विचाराचा मोठा विजय असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस २२ सप्टेंबर रोजी राज्यभर दुकानदार, व्यापारी आस्थापने येथे पेढे वाटून साजरा करणार आहे, असेही यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या…
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत. शेतपिकाबरोबरच लाखो एकर शेतजमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. आताचा हंगाम पुर्ण वाया गेला असल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्यावीत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, आदी मागण्या केल्या.
मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे फडणविसांचे काम..
पुढे बोलताना हर्षवर्धन सप़काळ म्हणाले की, राज्यात तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असून मराठी भाषा ही केवळ भाषा नसून महाराष्ट्र धर्म व संस्कृती आहे. तिसरी भाषा लादून देवेंद्र फडणवीस मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. मराठी भाषेसह सर्व भाषा गुण्यागोविंदाने नांदल्या पाहिजेत, विविधेत एकता ही भारताची ओळख आहे ती टिकली व जपली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. पण भाजपा मात्र ही ओळख पुसण्याचे काम करत आहे. डॉ. नरेंद्र जाधव समिती ही हिंदी भाषा लादण्यासाठी गठीत करण्यात आली आहे. समितीचा निर्णय काहीही येवो भाषेची सक्ती लादू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोकण विभागाची आढावा बैठक..
हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, कोकण विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली. याबैठकीत पक्ष संघटनेचा विस्तार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याविषयी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. युती व आघाडीचा धर्म पाळताना काही तडजोडी कराव्या लागतात त्यामुळे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व करता आले नाही. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचेही सांगितले.
Marathi e-Batmya