राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. दौरा सुरू होण्याआधी जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शेतकरी आपला कणा असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने चार पाऊले पुढे यावे असे आवाहन सरकारला केले आहे.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. ज्या ज्या ठिकाणी भेट देता येईल अशा ठिकाणी मी पाहणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. संकट इतकं मोठं आहे की शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने मदत करावी. एफडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आम्ही सरकारला विनंती करतो की या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी चार पाऊले पुढे येऊन मदत करावी.
हेक्टरीची भाषा नको, आता एकरी ५० हजार रुपयांची मदत द्या
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आमची मागणी आहे की सरकारने शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत करावी. एक महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने आता हेक्टरी उल्लेख करू नये, कारण सामान्य शेतकरी आता हेक्टरी शेतीवर राहिला नाही तर तो एकरीवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी नुसार मदत करावी. नदी काठाला ज्यांच्या जमिनी आहेत त्याठिकाणी संरक्षण भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात. जनावरांसाठी बाजारभावाने ६०-७०% रक्कम द्यावी. शेळ्या मेंढ्यासाठी १०-१२ हजार रुपये द्या. कारण आता शेतकऱ्यांना उठून उभे करण्याची गरज आहे. कारण आज जर शेतकरी उठला नाही तर तो ४-५ वर्षांसाठी कायमचा बसेल अशी भीताही यावेळी व्यक्त केली.
सरकार कार्यक्रमांवर, इव्हेंटवर खर्च करते, रोषणाईवर खर्च
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्ही वारंवार कर्जमाफीची मागणी करत आहोत. सरकार प्रत्येक वेळी म्हणतंय की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, मला वाटतं आता सर्वांत योग्य वेळ आहे. यापेक्षा दुसरी कोणती योग्य वेळ नाही. राज्य सरकारची परिस्थिती कशी आहे ते आम्हाला माहिती नाही. पण सरकार कार्यक्रमांवर खर्च करते, इव्हेंटवर खर्च करते, रोषणाईवर खर्च होत आहेत त्यामुळे सरकारकडे पैसा नाहीत असं म्हणण्याचे धाडस आमच्यात नाही. सरकारला आपण माय बाप म्हणतो, त्यामुळे माय बाप सरकारने कोणतीही कारणे न सांगता शेतकऱ्यांना मदत करावी. स्वतःचा खर्च जरा बाजूला ठेवा, केंद्राकडून मदत घ्या पण शेतकऱ्यांना सावरा कारण शेतकरीच आपला कणा आहे असे सांगितले.
पीएम केअर फंडातून २० हजार कोटी महाराष्ट्राला द्या
जयतं पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पीएम केअर ही खासगी ट्रस्टची व्यवस्था दिसते. जेव्हा कोरोना महामारी होती त्यावेळी असे दाखवण्यात आले की हा सरकारी ट्रस्ट आहे. त्यावेळचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत न करता, पीएम केअर फंडात निधी देण्याचे आवाहन केले होते. आता संधी आहे, पीएम केअरने महाराष्ट्राला २० हजार कोटी रुपये द्यावेत. त्यावेळी कदाचित त्यांच्याकडे जास्त पैसे जमा झाले आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यावेळी पीएम केअर फंडात मदत निधी देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी आता ते परत मागावे असे आवाहनही केले.
शेवटी जंयत पाटील म्हणाले की, या सरकारने एक रुपयात पिकविमा योजना आणली होती. ती पूर्णपणे फ्लॉप ठरली. पिकविमा योजनांमध्ये जाचक अटी असू नये, ज्याने शेतकऱ्यांना मदत होणार नाही. शेतकरी प्रिमियम भरतो, त्याचा चांगली नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. सरकारने लगेच ओला दुष्काळ जाहीर करावा, मराठवाड्याने प्रचंड दुष्काळ अनुभवला आहे. अतिवृष्टी हे सतत येणारे संकट आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याबाबत उपाययोजना करावी. २०००, ३००० रुपये शेतकऱ्यांना देऊ नका, ती शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखे होईल. जरा मनाचा मोठेपणा दाखवावा.
Marathi e-Batmya