महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, कारण सत्य शेवटी बाहेर येतेच, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर ट्वीट करत मागील दाव्होस दौऱ्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या MoU बाबत थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील दौऱ्यांतील MoU पैकी महाराष्ट्रात प्रत्यक्षात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक प्रत्यक्षात आली? आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले? हे प्रश्न आजही अनुत्तरित असल्याचे नमूद केले.
It is not fare to criticise Maharashtra CM’s Davos visit. If indeed there were MoUs worth Rs 30 lakh crore signed, then it is a matter of happiness. Foreign investment is necessary for the development of the state.
But it is not right to mislead by projecting inflated figures…— Prithviraj Chavan (@prithvrj) January 24, 2026
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “मोठ्या आकड्यांच्या घोषणा नव्हे, तर प्रत्यक्षात आलेली गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार महत्त्वाचा आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी आपल्या ट्वीटमधून मांडले.
दरम्यान, दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्याच राज्यातील किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करण्याबाबत कर्नाटक सरकारचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी यापूर्वी केलेले निरीक्षणही पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखित केले आहे. कर्नाटक सरकार दाव्होस मध्ये केवळ परकीय गुंतवणूकदारांशीच करार करते, त्यामुळेच कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर परकीय उद्योग येतात आणि त्या राज्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा अधिक असल्याचे सांगितले होते अशी आठवणही करून दिली.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या पार्श्वभूमीवर अदानी, लोढा यांसारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर दाव्होस मध्ये MoU करणे हे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या उद्देशालाच हरताळ फासणारे असून, हा प्रकार ‘क्रूर विनोद’ असल्याची टीका केली.
शेवटी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना इव्हेंट्स किंवा मोठ्या घोषणांपेक्षा पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष रोजगार हवा आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या दाव्होस दौऱ्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या MoU पैकी प्रत्यक्षात किती मोठे परकीय उद्योग महाराष्ट्रात सुरू झाले, किती गुंतवणूक आली आणि किती रोजगार निर्माण झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी ठाम मागणी केली.
Marathi e-Batmya