मंगलप्रभात लोढा यांची माहिती, इंडियन स्किल स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पुरस्कार उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 'कौशल्याचार्य विजेते शिल्पनिदेशक, राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील पदक विजेत्यांचा सत्कार

“इंडियन स्किल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना १ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार कौशल्य विकास विभागामार्फत देण्याची घोषणा कौशल्य,रोजगार,उद्योजकता व विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कौशल्य विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. यावेळी कौशल्य मंत्री लोढा यांनी राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर  राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ‘कौशल्याचार्य’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिल्पनिदेशकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यात सोसायटीचे आयुक्त डॉ अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर,व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी, डिपेक्सचे संचालक कनक कावडीवाले यासह महाराष्ट्रातील विजेत्या ‘आयटीआय’चे अधिकारी,विजेते विद्यार्थी उपस्थित होते.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.आगामी काळात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय करण्यात येणार आहे.सरकार केवळ कर्ज देऊन थांबणार नाही, तर प्रशिक्षणापासून ते मेंटरशिप,मार्केटिंगपर्यंत सर्व टप्प्यांवर तरुणांच्या पाठीशी उभे राहील.आज आपला महाराष्ट्र जीडीपी, परकीय गुंतवणूक, निर्यात, स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. अनेक देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी मोठा आहे.”मेहनत आणि कौशल्याची हीच खरी ओळख असून, युवा शक्तीच्या जोरावर आपण समृद्ध महाराष्ट्र घडवू,”असेही ते म्हणाले.

सेंटर ऑफ एक्सेलेंस‘ आणि नव्या तंत्रज्ञानावर भर – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की”देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) हा कणा आहे.राज्यातील ११०० हून अधिक सरकारी आणि खाजगी ‘आयटीआय’मध्ये उत्कृष्ट शिक्षण, उत्तम अभ्यासक्रम आणि उद्योगांशी अलाईनमेंट करत आहोत. “विभागीय स्तरावर आपण ‘सेंटर ऑफ एक्सेलेंस’ उभारण्याची तयारी करत आहोत. यामध्ये आयओटी (IoT), ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, व्हाईट वेल्डिंग आणि ईव्ही (EV) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत सुमारे ५४,००० विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म ट्रेनिंग मॉड्यूल्सचा लाभ मिळवून दिला आहे.”केंद्र सरकारच्या ‘पीएम इंटर्नशिप’ योजनेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, ‘पीएम सेतू’ आणि राज्याचे ‘पीपीपी मॉडेल’ या माध्यमातून मोठ्या उद्योग समूहांना आयटीआयच्या व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यासाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’  तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑन-द-जॉब ट्रेनिंग , अप्रेन्टिसशिप आणि प्लेसमेंटच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल.पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आता आयटीआयच्या मूल्यांकनाची नवी पद्धत विकसित करण्यात आली आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने विद्यार्थ्यांनी सतत नवीन गोष्टी शिकण्याची  मानसिकता ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे वार्षिक ‘कॅलेंडर’ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या .”दक्ष या प्रकल्पांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात नव दिशा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.असेही त्यांनी सांगितले.

डिपेक्स संकल्पनेतून महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्याला मिळणार नवी दिशा कौशल्य विकास आयुक्त डॉ अमित सैनी

आयुक्त डॉ.अमित सैनी म्हणाले की, मोबाईलवर वेळ विधायक कामासाठी आणि कौशल्य वृद्धीसाठी कसा वापरता येईल, यादृष्टीने ‘रील टू रियल टाइम’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरेल. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांना उद्योजक बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आयटीआयमध्ये ‘लर्निंग विथ अर्निंग’ ही योजना राबवण्यावर भर दिला जात आहे.दक्षिण कोरियाच्या धर्तीवर ही संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि उत्पन्न मिळवून देण्याचा मानस आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यानच उद्योजकतेची गोडी लागेल.’इंडिया स्किल स्पर्धेत भारताला मिळालेल्या एकूण पदकांपैकी महाराष्ट्रातील मुलांनी २२ पारितोषिके पटकावली आहेत.या यशाबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यात ही संख्या आणखी वाढेल, अशी आशा व्यक्त केली.

जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली मोहोर उमटवावी: कुलगूरू डॉ. अपूर्वा पालकर

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर म्हणाल्या की, “राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी महाराष्ट्राच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय असून, इथून घडलेले विद्यार्थी देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलत आहेत.राज्यातील आयटीआय, स्टार्टअप्स आणि जागतिक कौशल्य स्पर्धा मधील विजेत्यांना या पारितोषिकांमुळे कार्याला नवी ऊर्जा मिळते.ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील आयटीआय आज उत्तम कामगिरी करत आहेत. डिफेन्स एक्झिबिशन आणि महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून तरुणांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे अत्यंत स्तुत्य आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी जागतिक पातळीवर झेप घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ‘कौशल्यचार्य विजेते शिल्पनिदेशकराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील पदक विजेत्यांचा सत्कार

उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सन २०२२ -२३ साठी एकूण ८ पुरस्कार वितरण करण्यात आले यामध्ये  राज्यस्तरीय संस्था सन २०२२-२३ अमरावती विभागातून राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार वर्गीस कुरियन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी  जि. यवतमाळ, राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार अमरावती विभागातून मुंगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हा, जि. यवतमाळ, पुणे विभागातून फिल्ड मार्शल माणेकशॉ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुळशी, जि. पुणे यांनी राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त केला.

सन  २०२३-२४ साठी  राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुरस्कार ९ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.राज्यस्तरीय संस्था सन २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार डॉ.शामाप्रसाद मुखर्जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी जि. जालना, अमरावती विभागातून राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार हुतात्मा मधुकर चौधरी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड जि. यवतमाळ, अमरावती विभागातून राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांना पुरस्कार देण्यात आले तर विभागस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील २२ विजेत्यांचा व डिपेक्स स्पर्धेतील १३ विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.वंदे मातरम लोगो स्पर्धेतील रवी मोतीराम पवार,ओमकार कोळेकर,किरण कुलकर्णी यांना प्रथम,व्दितीय व तृतीय पारितोषिक वितरण करण्यात आले.कौशल्यचार्य पुरस्कार विजेत्या शिल्पनिदेशकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा सवाल, ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का? नकार दिला संसदेच्या दोन्ही सभागृहात आमच्या पक्षाच्या वतीने अजित दादांच्या अपघाताच्या चौकशीसंदर्भात मुद्दा मांडला

दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *