राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनेसंदर्भात सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.
मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस सामान्य रुग्णालय, गोंदिया यांनी गठित केलेल्या त्रिस्तरीय चौकशी समिती तसेच अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांच्या अहवालानुसार विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या अन्नामुळे विषबाधा झाल्याचे आढळून आलेले नाही.
पुढे बोलताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, गोंदिया येथील परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या अन्नाची व पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी केली जात असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये अशा घटना टाळण्यासाठी आणि व्यवस्थापनात एकसमानता आणण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya