मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांचा महापूर कायम आहे. जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार केल्याने त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी आणि पुन्हा राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मुंबईत नव्याने दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच मुंबईत तळ ही ठोकला जात आहे. शनिवारी आंदोलनाच्या दिवशीही जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई बाहेरुन मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदान परिसरात जमल्याने वाहतूक कोंडी होऊन दक्षिण मुंबई ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवार (२९ ऑगस्ट) पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक ट्रक, टेम्पो, कार, रिक्षा आदी मिळेल त्या वाहनाने मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलक मोठ्या संख्येने एकवटल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यात रिपरिप पडणाऱ्या पावसाने आझाद मैदानात चिखल झाल्याने आंदोलकांनी सीएसटीएम स्थानक, महापालिका मुख्यालय, सीएसटीएम स्थानकाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गात आसरा घेतल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्यातच महापालिका प्रशासनाकडून आवश्यक सुविधा पुरवल्या जात नसल्याचा असल्याचा आरोप करत आंदोलकांनी दुसऱ्या दिवशीही सीएसटीएम परिसरात रास्तारोको करत ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी एक मराठा- लाख मराठा च्या घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता पोलिस प्रशासनही अॅक्शन मोडमध्ये आले असून शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, आझाद मैदानावरील चिखल हटवण्यासाठी मैदानावर महापालिकेकडून दोन टन खडी रस्त्यावर टाकण्यात आली आहे. तसेच आंदोलकांच्या सोयीसाठी चार वैद्यकिय पथके, दोन रूग्णवाहिका, ११ पाण्याचे टँकर, २३६ शौचकुपी असलेली फिरती शौचालये अशा सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता ठेवण्यासाठी १०० कर्मचारी तैनात करण्यात आल्याचेही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या समर्थकांनी शनिवारी आझाद मैदानावर अर्धनग्न आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत या आंदोलकांनी अर्धनग्न होत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सर्वपक्षीय नेत्यांची रिघ लागल्याचे दिसून आले. यात शिवसेनेचे घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण, परभणीचे खासदार बंडू जाधव, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
Marathi e-Batmya