ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकण व नाशिक मधील शेती, फळपिकांचे आणि मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले. या वादळचा फटका ८ हजार ४५ शेतकरी व मच्छिमारांना बसला. त्या सर्वांना ६ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून हा निधी थेट नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करावा असे आदेश नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांना मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे सांगितले.

अरबी समुद्रात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये आलेल्या ओखी चक्री वादळामुळे शेतकरी तसेच मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना राज्य आपत्ती मदत निधीच्या निकषानुसार शेतीपिके व फळपिके नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच मच्छिमार बोटी व जाळींच्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या दोन्ही विभागातील नुकसानग्रस्तांसाठी निधी वितरित करण्यात आला. निधी नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात थेट जमा करावा. त्याचबरोबर या मदतीच्या रकमेमधून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे निर्देशही दिल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक विभागामध्ये १ हजार ५२३ शेतकरी बांधवांना ओखी चक्री वादळामुळे नुकसान झाले असून त्यासाठी २ कोटी ३७ लाख ३७ हजार रुपयांचा मदत निधी नाशिक विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. कोकण विभागात ६ हजार ५२५ नुकसानग्रस्तांना ३ कोटी  ६५ लाख ६ हजार रुपयांचा निधी कोकण विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला असून मच्छिमार बोटी व जाळीच्या नुकसानीसाठी मदत करताना बोट, होडी, यांत्रिकी बोट यांच्या अंशत: दुरुस्तीसाठी ४ हजार १०० रुपये मदतीचा दर आहे. तर पूर्णत: नष्ट झालेल्या बोट, होडी, यांत्रिकी बोटीसाठी ९ हजार ६०० रुपये, अंशत: बाधित झालेल्या जाळ्यासाठी २ हजार १०० रुपये आणि पूर्णत: नष्ट जाळ्यासाठी २ हजार ६०० रुपये मदतीचा दर देण्यात आला आहे.

शेती पिकांच्या तसेच बहूवार्षिक पिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी निकष २ हेक्टरपर्यंत जमीन धारक शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी ६ हजार ८०० प्रती हेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत मदतीची किमान रक्कम एक हजार पेक्षा कमी असणार नाही. बागायत क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत मदतीची किमान रक्कम एक हजार पेक्षा कमी असणार नाही. बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार प्रती हेक्टर प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत मदत २ हजार रुपयांपेक्षा कमी असणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *