राज्यातील महायुती सरकारला मिळालेल्या संशयातीत विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर मतदान चोर अशी टीका करत सत्ताधाऱ्यांबरोबर आमदारकीची शपथ घेण्याऐवजी उद्या रविवारी शपथ घेणार घेणार असल्याची घोषणा केली. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाने पुन्हा एकदा हिंदूत्वाचा मुद्दा लावून धरण्याचे घोषणा केली. तसेच या मुद्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा केली. या घोषणेचे कारण आमदार रईस शेख यांनी पुढे करत म्हणाले की, महाविकास आघाडीत असूनही शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून समाजवादी पार्टी बाहेर पडणार असल्याचेही आज विधानभवनात बोलताना सांगितले.
तर यासंदर्भात बोलताना आमदार अबू आझमी म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्या काळात त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही, तिकिट वाटपात आमच्याशी बोलणी केली नाही. मग आम्हाला त्यांच्याशी आमचे काही देणं घेणं काय असा सवाल उपस्थित करत ईव्हीएमबाबत जर लोकांना संशय असेल तर ते हटवलं पाहिजे. त्यासाठी जनतेच्या मागणीनुसार सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्याचा विरोध किंवा निषेध करायला पाहिजे, उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी आता सेक्युलर झालो. समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळविणी केली. आता विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर त्यांना आता हिंदूत्वाच्या गोष्टी आठवल्या का असा सवाल करत मला वाटतं महाविकास आघाडी चालणार नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना अबु आझमी म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्यावर काम करा म्हणून शिवसैनिकांना सांगितले जात आहे. तसेच ६ डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली त्या बद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. त्यामुळे अशा पक्षाबरोबर आम्ही राहु शकणार नाही त्यामुळे मविआसोबत राहिने असे वाटत नाही असेही यावेळी सांगत आम्ही कम्युनियल पक्षासोबत कसे राहणार असा सवालही केला.
दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. मात्र समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आणि रईस शेख यांनी महाविकास आघाडीचा भाग असूनही मविआच्या भूमिकेशी फारकत घेत आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
Marathi e-Batmya