गुन्हा दाखल झाल्यावर इम्तियाज जलील म्हणाले की, फारचं साधी कलमं लावली कदाचित मुख्यमंत्र्यांना त्यांचा भाऊ असल्याने तसे वाटलं असेल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीकास्तर सोडलं. विशेषत: राज ठाकरेंवर दाखल गुन्ह्यामध्ये जी कलमं लावण्यात आली आहेत, त्या कलमांविषयी जलील यांनी भूमिका मांडली.

इम्तियाज जलील म्हणाले की, कायद्यावर विश्वास असून मुस्लीम समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. मी लोकांना म्हणालो होतो की याबाबत काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. ज्या प्रकारे राज ठाकरेंनी भाषणात शब्दांचा वापर केला होता ते निंदनीय होतं. मी लोकांना म्हणालो होतो की रस्त्यावर येऊन काहीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. आपण प्रशासनावर विश्वास ठेऊ. “चला एकदा होऊन जाऊ द्या असं म्हणणं म्हणजे तुम्ही लोकांना उद्युक्त करत होते. कोणत्या शब्दांचा कसा वापर करायचा हे समजून घेणं ही तुमची जबाबदारी आहे असं देखील ते म्हणाले.

नवनीत राणांप्रमाणेच राज ठाकरेंवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, मी नवनीत राणांचं समर्थन करत नाही. पण नवनीत राणा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा देतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मग राज ठाकरेंनी वेगळं असं काय केलं आहे? याचं सरकारने मला उत्तर द्यावं. राज ठाकरेंविरुद्ध इतकी साधी कलमं का लावली आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय का की माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करू? राष्ट्रवादीला असं वाटतंय का की राज ठाकरेंसोबत भविष्यात जावं लागलं, तर त्यासाठी आत्ता त्यांच्यावर गंभीर कलमं लावली जाऊ नयेत? तुम्ही दाखवण्यासाठी काहीतरी थातुरमातुर कलमं लावली आहेत असं राज्यातल्या जनतेला वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरेंवर १५३, ११६, ११७, १७५ ही कलम लावण्यात आली आहेत. कायद्याच्या जाणकारांच्या मते ही सामान्य कलमं आहेत. यात सहज जामिन मिळू शकेल. भादंवि १२३ पेक्षा १५३ अ लावलं  असतं तर  योग्य झालं असतं. दोन समाजांमध्ये  तेढ निर्माण करणं हाच त्या सभेचा उद्देश होता. हे फार  गंभीर आहे. एखाद्या नेत्याने स्टेजवर उभं राहून कुठे तरी गडबड झाली तर त्यांना तिथेच मारा सांगणे चुकीचे आहे. तिथे मारले असते  काही झालं असते तर कोण जबाबदार असतं ? असा सवालही त्यांनी केला.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *