अजित पवार यांची स्पष्टोक्ती, राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट...

आज जाहीर झालेल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुक निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादीच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेने केवळ आश्वासनांना नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामाला, कार्यक्षम नेतृत्वाला पसंती दिली आहे. राज्याचा सर्वांगीण विकास, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील पायाभूत सुविधांसाठी आम्ही घेतलेले निर्णय मतदारांना भावले आहेत. हा विजय महायुतीचा सामूहिक विजय आहे. आम्ही जिथे एकत्र लढलो तिथे मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि जिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तिथेही लोकशाहीचा आदर करण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही आम्ही याच ताकदीने आणि समन्वयाने पुढे जाऊ. राज्यातील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने गेल्या वर्षभरात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे निर्णय घेतले, योजनांची, कामांची गतीने अंमलबजावणी केली, त्याचेच हे यश आहे. केंद्र सरकारचेही आम्हाला भक्कम पाठबळ मिळत आहे. नगरपालिकांच्या माध्यमातून शहरांचा कायापालट करणे, पाणीप्रश्न सोडवणे आणि रस्ते-आरोग्य सुविधांना प्राधान्य देणे हेच आमचे पुढील उद्दिष्ट असेल. राज्यातील जनतेने विकासाकडे बघून महायुतीला जे प्रचंड यश प्राप्त करून दिले आहे, त्याबद्दल राज्यातील तमाम जनतेचे,राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजित पवार यांनी आभार मानत यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहू-फुले- आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेनुसारच काम करत राहील. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपण्याचे काम करेल. या यशामुळे महायुतीची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी वाढली आहे. आम्हाला, आमच्या जिंकून आलेल्या सर्व नगराध्यक्षांना, नगरसेवकांना आता झोकून देऊन काम करावे लागेल, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला जेन-झी मध्ये राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपाची झोप उडाली, आता मुली व महिलाही राहुल गांधींच्या विचारांशी सहमत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *