भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? सीएए कायदा भाजपासाठी लागू होत नाही का? नाना पटोले.

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना पकडले गेले. आता भाजपाने या पुढे जाऊन एका बांग्लादेशी नागरिकालाच मुंबईत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी केल्याचे उघड झाले आहे. सीएए कायद्याचा धाक दाखवणाऱ्या भाजपासाठी हा कायदा लागू होत नाही का?, कि भाजपाचा पदाधिकारी झाल्याने बांग्लादेशी रुबेल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत  त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का याचे उत्तर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाने दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.

विलेपार्ले येथे आयोजित गुजराती समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सिंग सप्रा, गुजराती सेलचे भरत पारेख यांच्यासह गुजराती बांधव उपस्थित होते.

भाजपा नेहमीच दुसऱ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देत असतो. पण त्यांचेच राष्ट्रप्रेम बेगडी आहे हे रुबेल शेख या बांगलादेशी नागरिकाला उत्तर मुंबईचा पदाधिकारी करुन दाखवून दिले आहे. भाजपाचा पदाधिकारी झाल्यानंतर तो बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सीएए कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार आहे का? देशात लोकशाही नाही का? याची उत्तरे भाजपाला द्यावी लागतील असे ही ते म्हणाले.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. इंधनाच्या किमती सरकारच्या हातात नाहीत असे पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनीच राज्यसभेत जाहीरपणे कबुल केले आहे. हे सरकार फक्त ‘हम दो हमारे दो’ यांचेच आहे हे पुन्हा सिद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

बांग्लादेशी नागरिकाला भाजपाने अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आल्याने आगामी काळात विशेषत: मुंबई महापालिका निवडणूकीत हा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाजपाचे बेगडी देशप्रेम या निमित्ताने चांगलेच उघडकीस आल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *