छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, जल-जंगल-जमीन या तिन्ही घटकांवर आदिवासींचे हक्क देशाच्या मूळ संस्कृतीचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीचा खरा रक्षक आदिवासी समाज

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन हा दिवस केवळ आदिवासी समाजासाठी नाही, तर भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे.कारण आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या मूळ सांस्कृतिचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीच्या जतनाचा खरा रक्षक आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या “वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव” या कार्यक्रमात ते बोलत होते.

याकार्यक्रमात महाराष्ट्र विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सचिन अहिर, आमदार प्रसाद लाड, पद्मश्री राहीबाई पोपरे अभिनेते भाऊ कदम, नागेश भोसले, मेघा घाडे आणि अनेक क्षेत्रात काम करणारे मान्यवर तसेच राज्यातील विविध भागातून आलेले आदिवासी बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आज रक्षाबंधन तर आहेच पण आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. भारत छोडो आंदोलनाची सुरवात मुंबईतुन झाली. महात्मा गांधी यांच्यापासून ते अरुणा असफ अली, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, यांच्यापर्यंत सर्वांनीच या लढ्यात आपले योगदान दिलेच पण या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने केवळ हातभारच लावला नाही, तर अनेक वेळा नेतृत्वाची धुरा उचलली बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरोधात १८९९-१९०० मध्ये उलगुलान म्हणजेच महाआंदोलन उभे केले. हे आंदोलन केवळ ब्रिटीशांविरुद्ध नव्हते, तर जमिनीवर हक्क, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यासाठीचे ते युद्ध होते. महाराष्ट्रातील राघोजी भांगरे यांनी देखील आदिवासींच्या हक्कांवर इंग्रजांनी आणलेली गदा पाहुन मोठे बंड केले. राघोजीचे बंड पाहुन इंग्रजांनी त्या काळी ५ हजार रुपयाचे बक्षीस हे राघोजीला पकडणाऱ्यांना घोषीत केले पण पुढे तब्बल १० वर्ष ते इंग्रजांच्या तावडीत सापडले नाहीत. शेवटी १८४८ साली त्यांना पकडले आणि ठाण्यात त्यांना फाशी देण्यात आली. आदिवासी समाजात तंट्या भील, राणी दुर्गावती, अल्लुरी सीताराम राजू पण अशा असंख्य आदिवासी वीरांनी आपले प्राण गमावले, जेणेकरून आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो.

पुढे आपल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले की, पर्यावरण संरक्षणाची चर्चा तर आत्ता सुरू झाली पण माझा आदिवासी समाज पिढ्यांपिढ्या निसर्ग वाचवत आला आहे. आदिवासी समाज हा निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा समाज आहे. त्यांचे जीवन हे जल -जंगल-जमीन सोबत जोडलेले आहे. आदिवासी समजतील लोककला, नृत्य, वेशभूषा, संगीत आणि सण हे भारतीय संस्कृतीचे समृद्ध चित्र आपल्याला दाखवतात. जेव्हा जग शहरीकरणाच्या मागे पळत होते, तेव्हा आदिवासी समाजाने निसर्गाशी मैत्री करून जगण्याचा आदर्श दिला.

यावेळी बोलताना राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की आदिवासी समाजाची जीवनशैली ही निसर्गाची मिळती जुळती आहे. अनेक पालेभाज्या, झाडे यांच्या बाबतीत माहिती असणारा हा आदिवासी समाज आहे. अनेक औषधी वनस्पती देखील आमच्या आदिवासींना माहिती आहे. आदिवासी समाजातील विविध प्रथा आणि संस्कृती बाबत  झिरवाळ यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमामध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य देखील सादर करण्यात आले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *