मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट, तुमच्याकडचीही मतं आणली, पुढे आम्हीच सत्तेत महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार

विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्ताने १२ उमेदवार उभा करत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते म्हणत होते की, आमचा १२ उमेदवार निवडूण येणार म्हणून, पण या निवडणूकीत आम्हाला मिळणारी मते आम्ही मिळवलीच पण महाविकास आघाडीची मतंही आम्ही खेचून घेत ती आमच्याकडे आणली. त्यामुळे आता जी परिस्थिती आज दिसून आली. तीच परिस्थिती येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीत आमच्या बाजूनं दिसून येईल. त्यामुळे पुढच्या विधानसभेतही आम्हीच सत्तेत दिसू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दाखविला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक जाहिर झाली. त्या दिवशीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याला पाडायचं, त्याला पाडायचं याची चर्चा सुरु झाली. त्या दिवशी १२ वा उमेदवार पडणार हे जवळपास निश्चित झालं. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता राहिली नसल्याने महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाल्याचा खोचक टोलाही यावेळी विरोधकांना लगावला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शासनाने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे दुःख हलकं करू शकलो याचे समाधान असल्याचे सांगत राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर ‘संविधान भवन’ उभारण्याची घोषणा यावेळी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेल्या घोषणा अशा :

• राज्यात वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार

• चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकास आराखड्यासाठी २५० कोटी देणार

• मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास. सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ

• १५ वर्षाच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्याचा निर्णय
• पालघरला विमानतळ करणार

विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, आम्ही गेली दोन वर्ष सुखाचा आणि समृध्दीचा मंत्र घेऊन राज्याचा गाडा रुळावर आणला. आम्ही जनतेच्या दारात जाऊन काम केलं. त्यांच्या समस्या सोडवितानाच हे राज्य सर्व आघाड्यांवर देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. आज महाराष्ट्र देशात अनेक पातळ्यांवर अव्वल आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सुखी कुटुंबाचा विचार..

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वर्षाला १८ हजार रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही देतोय.अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर, महिलांना ५० टक्के तिकीट दरात आणि ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाचा लाभ, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता सरकार घेणार आहे, युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १० लाख सुशिक्षित तरुणांना १० हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंड, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविली, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थस्थळ दर्शन योजनाही आणली एका सुखी कुटुंबासाठी काय हवं काय नको याचा विचार करून सरकारने योजना आखल्याचेही यावेळी सांगितले.

नियम अटी बाजूला सारत शेतकऱ्यांना मदत

शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या मदतीबाबत सांगताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नियम अटीं बाजूला सारत आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा, किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे ३६ हजार कोटी रुपये दिले. ४४ हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी राबवतोय, शासनाने १२३ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यामुळे १६ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्ही दोन वर्षांत २८४ कोटींची मदत दिली आहे. आमच्या काळात २ लाख ३९ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणुक आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या संपूर्ण योजनांचा विचार केला, तर गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना ७५ हजार ७१० कोटींचा लाभ दिला आहे. अन्नदात्याच्या पाठिशी उभं राहता आल्याचे आम्हाला समाधान आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत नुकतेच राज्य सरकारला कृषी नेतृत्व समितीचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारही मिळाला आहे, असल्याचेही सांगितले.

पुन्हा मिळवली उद्योग स्नेही राज्याची ओळख

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आमच्या काळात गुंतवणूक आली, उद्योग आले आणि त्यातून रोजगारही निर्माण होत आहे. उद्योग स्नेही राज्य ही महाराष्ट्राची ओळख आम्ही पुन्हा मिळवली. राज्यात उद्योग येऊ लागल्याने त्याचा परिणाम परकीय गुंतवणुकीत दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम आहे. जुलै २०२२ ते आजतागायत १९१ उद्योगांना देकारपत्र दिले आहेत. राज्यात १ लाख ७१ हजार कोटी गुंतवणूक आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात मेगा लेदर फूटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंट, पीएम मित्रा, मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क करण्यात येत आहे. राज्याचे आयटी धोरण तयार केले असून नवे वस्त्रोद्योग धोरणातून अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. रत्नागिरीमध्ये आंबा-काजू पार्क करण्याचा निर्णय घेतल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गेम चेंजर ठरणार

मराठवाड्यातील योजनांबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देताना मराठवाडा वॉटर ग्रीड योजना या भागासाठी गेम चेंजर ठरणारी आहे. अनेक वर्ष या योजनेची चर्चा आहे. परंतु, आम्ही ही योजना आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी ‘मित्रा’ मार्फत जागतिक संस्थांकडून आवश्यक निधी उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असून बोलणी अंतिम टप्प्यात आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर युद्धपातळीवर काम हाती घेण्यात येईल, असेही सांगितले.

दोन वर्षांत मुंबईतले १०० टक्के रस्ते काँक्रिटचे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात ८ लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याचे सांगत येत्या दोन वर्षांत मुंबईतले १०० टक्के रस्ते काँक्रिटचे होणार असून कोस्टल रोडची वरळीपर्यंतची मार्गिका आम्ही खुली केली आहे. महिनाभरात सी लिंकलाही हा रस्ता जोडला जाईल. मुंबईचा हाच कोस्टल रोड आम्ही विरारहून पुढे डहाणूपर्यंत नेणार असून रेसकोर्सवर ३०० एकरमध्ये जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारत असल्याचेही यावेळी सांगितले

मराठा, ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

शेवटी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे १० टक्के आरक्षण दिले. हा निर्णय घेतल्यापासून शिक्षण, पद भरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना लाभ झाला आहे. आमच्या शासनाने ५ हजार अधिसंख्य पदांवर नियुक्ती दिली. दोन वर्षांत १ लाख सरकारी पदभरती पूर्ण करण्यात आली. दरवर्षी १० लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाही. आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, तर त्यातून सामाजिक सलोखा अबाधित रहावा यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका असल्याचे यावेळी नमूद केले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *