महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकार तर्फे पूर्णपणे अनास्था दिसून येत असून अद्यापपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे नाईलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा करत असताना कोल्हापूर, सांगलीच्या पूराचे हवाई पर्यटन केले. परंतु इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, महाराष्ट्रातल्या पूरस्थितींची पाहणी अमित शाह यांनी दुस-या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या समवेत केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावेळी त्यांच्यासमवेत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस हे सरकारने स्पष्ट करावे असा सवाल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केला.
आज टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्य आणि केंद्र सरकारने राज्यातल्या पूरस्थितीकडे गांभिर्याने पाहिले नाही म्हणून परिस्थिती वाईट झाली. केंद्र सरकारने अद्याप राज्यातील पूराला एल 3 आपत्ती म्हणून जाहीर केले नाही. त्यामुळे अद्याप केंद्राने राज्याला मदत दिली नाही. आता हळू हळू पूराचे पाणी ओसरू लागले आहे पण आता स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यासाठी सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते १६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम राबवून लोकांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर महाराष्ट्रातल्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन साधे ट्वीटही केले नाही. या पूरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पशुधन नष्ट झाले तर लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. पडझड झालेली घरे सरकारने बांधून द्यावी या व इतर मागण्यांसाठी उद्या बुधवारी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *