मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूकशिखर परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. क्षमता आणि सुविधांद्वारे येथील औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले.

हॉटेल ताज येथे आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषद २०२६ च्या समारोप  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आहेर- आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध ३०० हून अधिक उद्योजकाच्या सोबत १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून ३२ हजार इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

विकासाची मोठी संधी असलेले नाशिक हे शहर असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले, जिल्ह्यात गुंतवणूक व्हावी यासाठीचा कुंभ उद्योग संगम उपक्रम अतिशय चांगला आहे. या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून नाशिक विकासाच्या  मुख्य धारेत पुन्हा आला आहे. मागील तीन वर्षापासून आपण जिल्हा केंद्रित गुंतवणूक परिषद घेण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत एकूण ३१ हजार ९४५ कोटी रुपयांची गुंतवणूक  नाशिक जिल्ह्यात झाली आहे.  त्यातून ६६ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.  आतापर्यंत झालेल्या सामंजस्य करारापैकी ७७ टक्के कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स, कृषीआधरित सेवा, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, सेवा क्षेत्रासह इतर उद्योगातील गुंतवणुकीचा समावेश असल्याचे सांगितले.

नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षात ५७ हजार कोटींची गुंतवणूक

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातही अनेक उद्योग समूहानी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिंद्रा अँड महिंद्रा सारखी कंपनी नाशिकमध्ये गुंतवणूक करत आहे, जागा उपलब्ध झाल्यास या उद्योगाची त्वरित सुरूवात करण्यात येईल. याशिवाय, रिलायन्स, लार्सन अँड टुब्रो यासारख्या उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. अनेक उद्योगसमूह येथे उद्योगविस्तारासाठी इच्छुक असल्याचेही सांगितले. गेल्या दोन वर्षात ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिकसाठी आली असून दावोस येथे झालेल्या परिषदेत नाशिक जिल्ह्यासाठी १२ हजार कोटींची गुंतवणूक राज्य शासनाने आणल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात आता उद्योगाचे नवीन मॅग्नेट तयार झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक हे नवे मॅग्नेट तयार  झाले आहे. त्यामुळे नाशिकचा विकास आता थांबणार नाही. अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार हेही उद्योगासाठी गुंतवणुकीचे ग्रोथ इंजिन होत आहेत. याशिवाय, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना येथे मोठे उद्योग येत आहेत. विदर्भात नवीन मॅग्नेट तयार झालेत. विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचे नमूद केले

भौगोलिक समतोलावर भर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करायची आहे. त्यामध्ये भौगोलिक  समतोल असावा, यादृष्टीने काम सुरू आहे. सुरुवातीला केवळ मुंबई, पुणे आणि महानगर प्रदेश केंद्रित विकास असे धोरण होते. राज्य शासनाने जिल्ह्याला विकासाचे केंद्र केले पाहिजे, अशी भूमिका घेतली. जिल्ह्याच्या क्षमतांचा आणि सुविधांचा उपयोग केला पाहिजे. केवळ मोठ्या उद्योगांसोबत लघु उद्योगांना प्राधान्य देण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योजकांनासाठी उद्योगस्नेही धोरण आखले. विविध परवानग्या एक छताखाली आणल्या. त्यासाठी मैत्री सारखी सुविधा निर्माण करण्यात आली असून त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. मैत्रीद्वारे ३ लाखाहून अधिक अर्जांवर कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर उद्योग सुरू होत आहेत. महाराष्ट्र ही आता स्टार्टअप्सची राजधानी झाले आहे. राज्यात ३० हजाराहून अधिक स्टार्टअप्सची सुरुवात झाली आहे. शेती क्षेत्रात स्टार्ट अप्सने क्रांती केली आहे याशिवाय, एक ‘जिल्हा एक उत्पादन’ मधे मूल्यवर्धन करून राज्य शासन त्या माध्यमातून ब्रॅण्डिंग करत असल्याचे सांगितले.

कुंभमेळा विकासकामांमुळे  लाख कोटींची अर्थव्यवस्था तयार होईल.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन ३३ हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. ही गुंतवणूक पुढील १५-२० वर्ष उद्योगासाठी मॅग्नेटच काम करेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यामुळे निर्माण  झालेल्या दळणवळण सुविधा, ड्राय पोर्ट, पायाभूत सुवधा, रिंगरोड आदी सुविधांमुळे पुढील १० वर्षात ३ लाख कोटींची अर्थव्यवस्था नाशिक जिल्ह्यात तयार होईल. कुंभमेळा विकासाच्या दृष्टीने परिवर्तन करणारा  ठरेल. गुंतवणूकच्या संधी आहेत. याशिवाय गोदावरी शुद्धीकरण, पर्यावरण रक्षण , जल शुद्धीकरण याकडे लक्ष आहे. कुंभ अधिक सुगम कसा होईल याचा प्रयत्न असल्याचे सांगितले

समतेचाश्रद्धेचापर्यावरण रक्षणाचा कुंभ होणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा सिंहस्थ कुंभमेळा  डिजिटल कुंभ करायचा आहे. त्याची चांगली तयारी सुरू आहे. कमी काळात सगळी कामे अधिक गतीने पूर्ण करण्यात येत आहेत.  भेदभाव विरहित भारतीय संस्कृतीच्या आस्थेचा सर्वात मोठा अविष्कार आणि अर्थव्यवस्थेला गती देणारा समता आणि श्रद्धेचा मेळा म्हणजे कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा सर्वाधिक उपयोग असणारा हा कुंभ असेल. प्रत्येकाला अध्यात्मची आनंददायी अनुभूती मिळावी यासाठी सर्व सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाहीही दिली.

कुंभमेळ्यासारख्या अध्यात्मिक पर्वाला उद्योजकतेशी जोडण्याचे कार्य या परिषदेच्या माध्यमातून झाले असल्याचे नमूद करून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककरांचा आहे. कुंभमेळ्याचे आयोजन आव्हानात्मक असून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांना सुविधा द्याव्या लागतील. यासाठी उद्योजकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नाशिकची राज्यातील इतर भागाशी कनेक्टिव्हिटी वाढते आहे. विमानतळाचाही विस्तार करण्यात येत आहे, रेल्वे सुविधांचा विस्तार होत आहे. नाशिक उद्योग क्षेत्रात पुढे जावे यासाठी प्रयत्न सुरू असून त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होऊन जिल्ह्याचा विकास होईल. उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प असून स्वच्छ, सुंदर, हरित आणि सुरक्षित नाशिकसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाजन यांनी केले.

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, उद्योगांना आतापर्यंत साडे चौदा हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. मैत्री कक्षाच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहेत. या कक्षाकडे प्राप्त अर्जांपैकी ९९ टक्के अर्ज मार्गी लावले आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, राजूर बहुला, मनमाड आदी ठिकाणी एमआयडीसी साकारण्यात येणार आहे. त्यासाठी १ हजार ३०० एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून ६७ हजार युवक- युवतींनी कर्ज घेत स्वयंरोजगार सुरू केला आहे. दावोस येथे झालेल्या करारापैकी सर्वाधिक अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. कुंभमेळ्यात उद्योग विभागातर्फे टेन्ट सिटी उभारण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागातर्फे देखील कार्यक्रम घेण्यात येतील. महिंद्राचा प्रकल्प नाशिकमध्येच होईल अशी ग्वाही दिली.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील विकास कामांची माहिती दिली.  ते म्हणाले, नाशिक कृषी, धार्मिक पर्यटन क्षेत्रात अग्रेसर असण्यासोबत उत्तर महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने ३५ हजार कोटींची विकासकामे करण्यात येत आहे. रस्ते, विमानतळ, रेल्वे, डिजिटल पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. नाशिक समृद्धी महामार्गाद्वारे जोडलेले आहे.

नाशिक ते चेन्नई, नाशिक ते वाढवण, नाशिक रिंग रोड अशा मार्गांमुळे प्रगतीला अधिक चालना मिळेल. एनएमआरडीए विकास आराखड्यामुळे नाशिक परिसरातील पायाभूत सुविधाचा विकास होईल. या सर्व कामांमुळे नाशिक मंत्र, तंत्र आणि  यंत्रभूमी म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील विकासासोबत समृद्ध वारशाची जपणूक करण्यात येईल, असेही डॉ. गेडाम म्हणाले.

विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विषद केली. ते म्हणाले, राज्यातील विविध जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमद्वारे एकूण ९६ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले, त्यापैकी १२ हजार कोटींचे करार नाशिकसाठी करण्यात आले. राज्यातील  करारांची एकूण फलश्रुती ७२ टक्के  आहे. कुंभ उद्योग संगमाच्या माध्यमातून ३०० पेक्षा अधिक आणि १४ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचे करार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक धार्मिक, सांस्कृतिक शहर, वाईन कॅपिटलसोबत औद्योगिक शहर म्हणून ओळखले जावे असा प्रयत्न असून उद्योग उभे राहण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी, बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले पुष्पक विमान प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *