मेक इन इंडियाच्या गप्पा मारणा-यांच्या काळात फक्त कुलूपांचे उत्पादन वाढले काँग्रेस प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांचा मोदी सरकारवर आरोप

मुंबईः प्रतिनिधी
सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात भयंकर मंदी आली आहे. कृषी, ऑटो उत्पादन क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांना मंदीचा मोठा फटका बसला असून लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरात हजारो लाखो कंपन्यांना टाळे लागले. मेक इन इंडियाच्या गप्पा मारणा-या भाजप सरकारच्या काळात फक्त कुलूप बनवणा-या कंपन्याचे उत्पादन वाढल्याचे दिसत असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी केली.
गांधीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशातील उद्योगांना मंदीचा मोठा फटका बसला आहे. पण केंद्र सरकार मंदीवर काही न बोलता पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या बाता मारत आहेत. पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्री आणि भाजपाशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्या भाषणात नेहमीच पाचचा आकडा असतो. पाच हा आकडा सरकारमधील लोकांचा आवडता असल्यामुळे ते वारंवार त्याचा उल्लेख करतात पण पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी तयार होईल हे मात्र सांगत नाहीत. मंदीचा मार कमी करण्यासाठी सरकार काहीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत या सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून अर्थमंत्री दर आठवड्याला अर्थसंकल्पातील तरतूदींमध्ये बदल करत आहेत. सरकारचे हे प्रयत्न म्हणजे कॅन्सरवर बाम लावून उपचार करण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली.
सरकारने रिझर्व्ह बँकेकडून १ लाख ७६ हजार कोटी रूपये घेतले पण त्या पैशाचे काय केले? किंवा काय करणार हे सरकार सांगत नाही. आरबीआयला यांनी कसे लुटले हे सर्व जनतेने पाहिले आहे. मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमातून ३० लाख नवीन रोजगार देऊ असे सरकारने सांगितले होते, पण सरकार किती रोजगार निर्माण झाले ते सांगत नाही. सरकारने केलेल्या दाव्यानुसार राज्यात ७३ लाख नवीन रोजगारांची निर्मिती व्हायला हवी होती. पण या सरकारच्या काळात नविन रोजगार निर्मिती होण्याऐवजी असलेले रोजगार जात आहेत. २००८ मध्येही जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे योग्य नेतृत्व होते, त्यामुळे देशाला त्या मंदीचा फटका बसला नाही, व अर्थव्यवस्था त्यातून सावरल्याचे त्यांनी सांगितले.
मागील पाच वर्षात रिझर्व्ह बँकेचे ३ गव्हर्नर राजीनामा देऊन गेले. या सरकारसोबत कोणीही अर्थतज्ञ काम करायला तयार नाही. देशातील युवक मला नोकरी का देत नाहीत? असा प्रश्न सरकारला विचारत आहेत पण सरकार उत्तर देत नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदांच भारतातील लोक देशापेक्षा परदेशात जास्त गुंतवणूक करायला लागले असून हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष महाराष्ट्र, हरियाणा व झारखंडमधील निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार असून आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतक-यांची दुरावस्था हे मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि या तिन्ही राज्यात सत्ताबदल होऊन पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, यशवंत हाप्पे, डॉ. गजानन देसाई, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, आनंद सिंग आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *