बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापन दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी जवळपास पाच वर्षानंतर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव त्या याचिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर न्यायालयात जर एखादी याचिका दाखल आणि प्रलंबित असेल तर त्यात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सभागृहात त्यावर चर्चा करता येत नाही असे संकेत आहेत. मात्र आज त्या संकेताला बाजूला सारत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सदस्या मनिषा कायंदे यांनी पाँईट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित करत दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचे गुढ कधी तरी बाहेर येणार आहे का नाही असा सवाल करत त्यात एका बड्या नेत्याचा हात असल्याचे सांगत त्या संदर्भात एसआयटीचा अहवाल बाहेर कधी येणार अशी विचारणाही केली.
त्यानंतर भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित करत दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. तो अहवाल जाहिर करावा अशी मागणी करत संबधित बड्या नेत्याच्या आमदार मुलावर कारवाई करण्याची वेळ आली तर करावी अशी मागणी करत याप्रकरणी नितेश राणे यांच्या वक्तव्यात तथ्य वाटते असेही यावेळी सांगितले. त्यानंतर भाजपाचे चित्रा वाघ यांनीही असाच मुद्दा उपस्थित करत त्यावेळी जी एसआयटी स्थापन करण्यात आली. त्या एसआयटीचा अहवाल कधी जाहिर करणार असा सवाल करत या प्रकरणात जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करवाई अशी मागणी केली. यावेळी भाजपाच्या उमा खापरे यांनीही यासंदर्भातील मुद्दा मांडला.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हरकत घेत म्हणाले की, न्यायालयात याचिका दाखल असताना त्यावर सभागृहात चर्चा करता येत नाही. मात्र ती प्रथा सभापतींनी बाजूला ठेवली आहे का असा सवाल सभापती राम शिंदे यांनी करत एका पॉंईट ऑफ इन्फॉरमेशनच्या मुद्यावर सत्ताधारी बाकावरील चार चार जण बोलण्याला तुम्ही कशी काय परवानगी देऊ शकता असा सवाल करत विरोधकांनीही असेच करण्यात येऊ लागले तर त्यावेळी ही आता नव्याने निर्माण केलेली प्रथा कायम ठेवणार का असा सवाल केला.
त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलायला उठून उभा राहिले, त्यांनी बोलण्यास सुरुवात केली नाही तोच सत्ताधारी पक्षाचे मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली. त्यावर अंबादास दानवे म्हणाले की, एक तर मला तरी बोलू द्या नाही तर मंत्र्यांना एकट्यालाच सभागृहात बोलू द्या, पण प्रत्येक वेळी मी बोलायला उभे राहिलो की, ते मध्य का बोलत असतात असा सवालही गिरिष महाजन यांना यावेळी केला. त्यावर गिरिष महाजन यांनी अंबादास दानवे यांना उचकाविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून गिरिष महाजन आणि अंबादास दानवे यांच्यात शाब्दीक बाचाबाचीला सुरुवात झाली. त्यावेळी या दोघांमधील शाब्दीक बाचाबाची वाढली म्हणून १० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज सभापती राम शिंदे यांनी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा नियमित कामकाजाला सुरुवात झाली.
त्यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सरकार आपलं आहे सीआयडी आपलीच आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिशा सालियन प्रकरणी आणखी काही नवे सरकारला वाटत असेल तर त्यांनी याप्रकरणी काय कारवाई असे सांगत ठरविण्यात आलेले कामकाज चालविले जात नाही, मनाला वाटेल ते कामकाज चालविण्यात येत आहे, हे अधिकारीही चुकीचे कामकाज होत आहे असा आरोपही यावेळी करत दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकार पुढाकार घेत आहे मात्र याच राज्यातील पूजा चव्हाण प्रकरणी मात्र सरकार काहीच भूमिका घेत नाही असे करू नये असे सांगत फक्त एकाच महिलेच्या प्रकरणी वारंवार सरकारने भूमिका घेणे आणि अन्य एका महिलेबाबत भूमिका न घेणं योग्य नाही असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर अनिल परब म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन करतो, केवळ तुम्ही घेतलेल्या निर्णयाला केवळ न्यायालयात आव्हान देता येत नाही या केवळ एका अंब्रेला खाली तुम्ही जे काही नियमबाह्य रूलिंग देत आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील केस मागील पाच वर्षापासून न्यायालयात सुरु आहे. त्याबाबत सीबीआयची चौकशी झाली, एसआयटीची चौकशी झाली मग मागील दिड वर्षे एसआयटीचा अहवाल सभागृहात का मांडला जात नाही असा सवालही केला.
तसेच पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, जेव्हा सीबीआयचा रिपोर्ट आला त्यावेळी मनिषा कायंदे यांनी त्यावेळी ट्विट केले होते की, आता आरोप करणाऱ्या नितेश राणे आणि नारायण राणे यांनी आता नाक घासून माफी मागावी असे ट्विट केले होते. मनिषा कायंदे तू तर सरड्यापेक्षा फार लवकरच रंग बदललास अशी खोचक आरोप केला. जयकुमार गोरे यांचे उघडे नागडे फोटो सभागृहासमोर आले त्या जयकुमार गोरे याचा राजीनामा मागायचा ना, ज्या पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड याचे नाव आले, त्याचा राजीनामा मागायचा ना असे आव्हान वजा मागणी करत केवळ वरिष्ठाना खुष करायचे म्हणून असली माहिती पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन मधून आणायची, जी गोष्टी फक्त स्वतःला कळली, त्याची माहिती पॉइइट ऑफ इन्फारमेंशन असतो, सगळ्या टीव्ही चॅनल्स आणि वर्तमान पत्रात छापून आलेल्या गोष्टी पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनमध्ये कशी असू शकते असा सवाल करत केवळ विरोधी पक्षाची ताकड कमी आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा हे कसलं तुमचं सांसदीय राजकारण असा सवालही यावेळी केला.
मात्र त्यानंतर भाजपाचा सदस्या चित्रा वाघ आणि इतर भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज पुन्हा स्थगित करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बोलायला उभे राहिलेले म्हणाले की, मनिषा कायंदे यांच्याबाबत जे काही रंग बदलणारे वैगेरे वक्तव्य काढून टाकावे अशी मागणी केली. त्यावर तालिका सभापती निरंजन डावखरे म्हणाले की, जे असंविधानिक असेल ते काढले जाईल.
त्यावेळी भाजपाच्या चित्रा वाघ बोलायला उभ्या राहिल्या, त्याचवेळी अनिल परब हे सभागृहात आले, त्यांना पाहून म्हणाले की, अनिल परब बरे झाले तुम्ही आलात, मी तुमलाच उत्तर द्यायला उभी आहे, तुम्ही असाल फार मोठे कायदे तज्ञ, पोपट पंडित पण, संजय राठोड यांच्या प्रकरणी जे पुरावे आले माझ्या समोर ते पुराव्याच्या आधारे मी लढले, तेव्हा तुम्ही काय करत होते इथ बसून सभागृहात. तुमची हुशारकी तर मला कधी बाहेर कधी दिसली नाही, जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते तेव्हा तुम्ही आमच्या घराच्यांवर जाताय, काय परिस्थितीत आम्ही लढलो पण तुमचे चेले चपाटे आम्हाला काय त्रास देत होते, ते सांगू का असा सवाल करत मी तुम्हाला घाबरत नाही, तुमच्यासारखे ५६ जणांना पायांना बांधून फिरते. जो प्रश्न तुम्ही संजय राठोड यांचा विषय काढलात तर तुमच्या सरदारांना विचारा, का दिली क्लिन चीट असा सवाल करत तुम्ही विचारत नसाल तर मी येते विचारायला असे सांगत आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही फार काही महिला नाही तीन चारच आहोत, त्यामुळे पण अनिल परब आमच्या नादीला लागू नका जर बोलायला लागले तर समोरची बाके रिकामे होतील असा सज्जड इशारा देत केवळ महिलांबाबत अनिल परब यांची भूमिकेला उत्तर द्यायचे होते म्हणून मी बोलायला उभे राहिले, नाही तर माझा आणि अनिल परब यांचा दूरदूरचा काडीचाही संबध नाही असे सांगत खाली बसल्या.
त्यानंतर सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही नळावरची भांडणे बंद करा, ही भाषा आवरा अशी सूचना करत हा विषय आता इथेच थांबवा असेही यावेळी म्हणाले. त्यावर तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
Marathi e-Batmya