एकनाथ शिंदे यांचे आदेश, प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या संदर्भामध्ये ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडूनही परिस्थितीची माहिती घेतली व मदत कार्याबाबत सूचना दिल्या. या सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू राहतील आणि या पक्षातल्या अधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहून काम करावे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा यावर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारती संदर्भात देखील काळजी घ्यावी, मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू कशी राहील, किंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क रहावे, असे निर्देश प्रशासनाला दिले.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे. राज्य सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीमध्ये १२ वर्षानंतर भरीव वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी पाठबळ मिळेल अशारितीने शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *