विधान परिषदेची आमदारकी- बच्चू कडू थेट शिंदे शिवसेनेत दाखल प्रहार संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व, विधान परिषदेसाठी बच्चू कडू, नीलम गोऱ्हे यांना संधी

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनीही विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्याच्या काही वेळ आधी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर बच्चू कडू यांच्या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली. या मे महिन्यातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या निवृत्त होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे आणि माजी आमदार बच्चू कडू यांची उमेदवारी जाहिर केली.

अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीला अवघे दोन तास शिल्लक असताना घेतलेल्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असली तरी राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातून उभारला जाईल, असे जाहीर केले. तसेच शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, दलित, शोषित आणि गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पुढील वाटचाल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच असेल, असेही स्पष्ट केले.

बच्चू कडू यांची ओळख ही आंदोलनातून उभी राहिलेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेले मोर्चे, दिव्यांगांसाठी उभारलेले आंदोलन, तसेच गोरगरीब, शोषित आणि पीडित घटकांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली, असे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू यांच्या आंदोलनांमुळे सरकारला कर्जमाफीसारखे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, याची आठवणही एकनाथ शिंदे यांनी करून दिली.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंच्या लढाऊ स्वभावाचे कौतुक करत अन्यायाविरुद्ध लढा हा बाळासाहेबांच्या विचारांचा गाभा असल्याचे सांगत “आपले आणि बच्चू कडू यांचे विचार एकच सर्वसामान्यांना न्याय देणे,” आहे. सामाजिक लढ्याला राजकीय ताकदीची जोड देण्याची गरज अधोरेखित केली. “मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असे ठामपणे सांगितले.

दरम्यान, प्रहार संघटना स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कायम राहणार असली तरी ती शिवसेनेशी संलग्न राहील. त्यामुळे रस्त्यावरची ताकद आणि सत्तेची ताकद एकत्र येऊन सामाजिक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असे चित्र निर्माण झाले आहे. बच्चू कडूंनीही हा प्रवेश केवळ उमेदवारीसाठी नसून विचारांच्या एकतेसाठी असल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे एका बाजूला आंदोलनातून आलेले नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी नेतृत्व म्हणून अॅड नीलम गोऱ्हे असे संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून येतो.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. आगामी काळात पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये मोठे राजकीय परिवर्तन होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मुरजी पटेल आणि शिवसेना आणि प्रहार संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

महाराष्ट्रात हरित ऊर्जेसाठी १२ हजार ३०३० कोटींची मॅजेस्टिक योजना २०३० पर्यंत अक्षय उर्जेचा स्रोत ५० टक्क्यांवर पोहचणार

राज्यातील हरित ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढविणे, पारेषण प्रणाली अधिक सक्षम करणे आणि ऊर्जा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *