नाना पटोलेंचा टोला, आता ईडी काय हजार पाचशे रूपयांची चौकशी करणार का? कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजपा ईडीच्या आश्रयाला

भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातील मतदारांनाच दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
भाजपाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल अशी धमकी दिली हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाचा जनाधार घसरला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्राच्या जनतेने जागा दाखवून दिलेली आहे. कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणार हे निश्चित आहे. भाजपाला कोल्हापुरात पराभव दिसत असल्याने निराशेपोटी चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली. काही लोक पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटत असून तुम्ही ते पैसे घेतले तर त्याची चौकशी ईडीकडून केली जाऊ शकते अशी धमकी देण्यात आली आहे. आता ईडी हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का? आणि ती चौकशी भाजपाच्या इशाऱ्यावर होणार का? असा सवालही उपस्थित केला.
ईडी, आयकर, सीबीआय यांचा मागील सात वर्षात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात गैरवापर वाढला असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्ता मिळाली नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भितीचे वातावरण निर्माण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असतात. कोल्हापुरची स्वाभिमानी जनता मात्र या पोटनिवडणुकीतही चंद्रकांत पाटील व भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उत्तर कोल्हापूर निवडणूकीच्या प्रचारासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या ठाण मांडून आहेत. मात्र काहीजणांकडून पेटीएमद्वारे पैसे वाटत असल्याचा आरोप करत या पैसे वाटपाची ईडीकडून चौकशी होणार असल्याचे सांगत मतदारांनी पेटीमद्वारे पैसे घेतल्यास त्यांचीही चौकशी होणार असल्याचा गर्भित इशारा पाटील यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका करत पलटवार केला.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *