महायुतीकडून रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या दोन जागा रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश

रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत. तसेच महायुतीची सत्त्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व आणि राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद तसेच ४ महामंडळ अध्यक्ष पदे आणि महामंडळ संचालक पदे जिल्हा तालुका शासकीय कमिटी सदस्य पदे तसेच महापालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे महायुती द्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी; दलितांच्या विकासासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला सारून नव्या दमाने भाजपा शिवसेना रिपाइं राष्ट्रवादी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मुंबईत बांद्रा येथील रामदास आठवले यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सुरेश बार्शिंग; दयाळ बहादुर ; विवेक पवार;घनश्याम चिरनकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाला शिवसेना पक्षाच्या कोट्यातून धारावी मतदारसंघ आणि भाजपाच्या कोट्यातून कालिना हे मुंबईतील दोन मतदार संघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आले. त्याबाबतची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी केली.

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी दूर सारून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांनी महायुतीकडे १० ते १५ जागांची मागणी केली होती. मात्र १० ते १५ जागांवरून अवघ्या २ जागा महायुतीकडून रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाला देवू केल्या आहेत.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *