आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश, भूखंड सुपुर्द वित्तमंत्री अजित पवार यांचे उर्दू घरासाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन

भिवंडीमध्ये लवकरच शानदार ‘उर्दू घर’ उभे राहणार आहे. या प्रस्तावित उर्दू घरासाठी आवश्यक २५०० चाै. मी. भूखंड ठाणे जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे नुकताच सुपूर्त केला. भिवंडीत उर्दू घर उभे राहावे, यासाठी ‘भिवंडी पूर्व’चे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख सातत्याने पाठपुरावा करत होते. आमदार शेख यांच्या पाच वर्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

यासदंर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, २०११ च्या जनगणनेनुसार उर्दू भाषकांची १. २५ लक्ष लोकसंख्या असलेल्या परिसरात ‘उर्दू घर’ उभारण्याची योजना राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने वर्ष २०२२ मध्ये आणली आहे. त्या निकषांमध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश होता. मात्र भिवंडीचा उल्लेख नव्हता. भिवंडीमध्ये सर्वाधिक उर्दू भाषक आहेत. मी भिवंडीत उर्दू घर उभे राहावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. दरम्यान राज्यात तीन सरकारे बदलली गेली.

आमदार रईस शेख पुढे म्हणाले की, चाविंद्रे ग्रुप ग्रामपंचायत मधील नागांव येथील जमीन उर्दू घरासाठी मिळाली. त्या जमिनीवर गुरचरण आरक्षण होते. ते आरक्षण हटवण्याच्या प्रक्रियेत यश आले. अखेर अल्पसंख्याक विकास विभागाच्या नावे सीटी सर्वे क्रमांक ३०८७ ते ३१०१ मधील २५०० चौ. मी. जमिनीची फेरफार नोंद करण्यात आली. तहसीलदार भिवंडी यांनी या भूखंडाचा अल्पसंख्याक विकास विभागाला सात-बारा सुपूर्त केला. उर्दू घराचे बांधकाम जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.

आमदार रईस शेख पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाली. दिवाळीनंतर यासदंर्भात बैठक लावू आणि भिवंडीतील उर्दू घरासाठी पुरेसा निधी देवू असे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिले. या उर्दू घराचा आराखडा तयार आहे. एक मोठे प्रेक्षागृह, दोन बैठक हॉल, महिलांसाठी विश्रामगृह, दोन स्वच्छतागृहे, ग्रंथालय, व्यवस्थापक कक्ष, स्टोअर रुम, वाहनतळ, अल्पोपहार कॉर्नर अशी येथे व्यवस्था असेल, असेही यावेळी सांगितले. .

शेवटी बोलताना रईस शेख म्हणाले की, हे उर्दू घर भिवंडीतील नवे आकर्षण राहील. उर्दू साहित्यिकांसाठी हे हक्काचे ठिकाण राहील. या उर्दू घरांमुळे भिवंडीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ होईल. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत २२/६२ हे पहिले डीजीटल स्कूल आपण उभे करुन दाखवले. त्यानंतर उर्दू घरांची दुसरी भेट भिवंडीकरांना देत आहोत. उर्दू घराचे भिवंडीकरांना दिलेले आश्वासन पूर्णत्वास जात असल्याचे समाधान असल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, डॉ आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *