आपला महाराष्ट्र समृद्ध आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची ताकद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती झाली तर देशाचे भविष्य उज्जवल होणार आहे. शिवशाही आणि रामराज्याच्या अपेक्षेने जनतेने अभूतपूर्व यशातून बहाल केलेल्या या सत्तेचा उपयोग करून महाराष्ट्र समृद्ध व्हावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, महाराष्ट्रात शिवशाही निर्माण व्हावी, ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची, आमदारांची, खासदारांची जबाबदारी आहे, याची कायम जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातही समस्या आहेत, पण त्या सोडविण्याची क्षमता आणि विश्वास आपल्या नेतृत्वाकडे आहे, त्यामुळे शिवशाही आणल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार करण्याचे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी प्रदेश भाजपाच्या महाविजयी अधिवेशनात बोलताना केले.
छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्याची प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊंचे, स्वामी विवेकानंदांचे स्मरण करून आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी यांनी भाजपाच्या यशस्वी वाटचालीचा संपूर्ण पट सहजपणे कार्यकर्त्यांसमोर उलगडला. कार्यकर्त्यांचा समर्पणभाव, नेत्यांची क्षमता आणि ‘राष्ट्र सर्वोपरी’ ही पक्षाची शिकवण याच्या जोरावर महाराष्ट्रास संपन्न, समृद्ध करून सामाजिक समता, विकास आणि देशाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडू असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, २१ वे शतक हे हिंदुस्तानचे असेल अशी भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली होती. ती भविष्यवाणी खरी करण्याची जबाबदारी आपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वगुरू बनविण्याचे आणि आत्मनिर्भऱ भारताचे स्वप्नही आपल्याला पूर्ण करायचे आहे. पाच ट्रिलियन डॉलरची जगातील तिसरी अर्थव्यवस्था म्हणून देशाला पुढे न्यायचे आहे, कारण याच स्वप्नांचा संबंध रामराज्याशी आणि शिवशाहीशी आहे, असेही यावेळी सांगत ते पुढे म्हणाले की, शिवशाहीच्या स्थापनेच्या अपेक्षेने जनतेने आपल्याला हे अभूतपूर्व, ऐतिहासिक यश दिले आहे. हे यश म्हणजे आपल्या पक्षाकरिता सुवर्णशिखर आहे. मोदीजींच्या, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे अभूतपूर्व यश आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते या यशाचे मानकरी आहेत. जनतेने ज्या अपेक्षेने हे यश दिले, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी देखील जनतेने दिली असल्याचेही यावेळी सांगितले.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा छत्रपतींचा, सावरकर, शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ही संतांची भूमी आहे. संतविचारांचा, लोककल्याणाचा प्रभाव असलेला महाराष्ट्र आपल्याकडून निर्माण व्हावा, ही जनतेची अपेक्षा आहे. या विजयातून मिळालेल्या ताकदीतून भविष्यातील महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प आज आपण करणार आहोत, असा विश्वासही व्यक्त केला.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, सत्तासंपादन हे ध्येय नसून समाज बदलणे हा आपला उद्देश आहे. देशाचे नेतृत्व कसे असावे यापेक्षा देश कसा असावा हा विचार महत्वाचा आहे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणत असत. देशातील जनतेला सुखी करणे, देशाच्या सीमा सुरक्षित करणे, दहशतवादी, जातीयवादापासून देशाला मुक्ती देऊन समाजिक समता व सुरक्षितता प्रस्थापित करणे व या विजयातून मिळालेल्या यशातून महाराष्ट्रात सुराज्य स्थापन करणे ही आपली जबाबदारी आहे. राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास साधत गरीबी, बेरोजगारी दूर करून समाज समाधानी करणे व शक्तिमान देशाची उभारणी करणे हा भाजपाच्या विचाराचा आत्मा आहे. हे करण्यासाठीच जनतेने आपल्या हाती सत्ता दिली आहे. या सत्तेच्या माध्यमातून रयतेचे कल्याण हा छत्रपतींच्या शिवशाहीचा आदर्श समोर ठेवून परिवर्तन घडविण्याची जबाबदारी आपली असल्याचेही यावेळी सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले की, तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी एका विचारातून चांगले कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांची फळी जनसंघाकरिता दिली, तेव्हापासून आपले कार्यकर्ते अथकपणे, निरपेक्षपणे ध्येयाकडे वाटचाल करत राहिले. हा काळ कठीण होता. आणीबाणीसारखा हालअपेष्टांचा काळ कार्यकर्त्यांनी सहन केला. जनसंघ संपला असे लोकांना वाटू लागले, पण त्यातूनही आपण सावरलो, उभे राहिलो, आणि पुढे भाजपाच्या रूपाने आपण अधिक शक्तीनिशी उभे राहिलो. सूर्योदय होऊन प्रकाश येईल, कमळ फुलेल आणि या देशाचे भविष्य बदलल्याखेरीज आम्ही राहाणार नाही, अशी भविष्यवाणी अटलबिहारी वाजपेयी यांनी वर्तविली होती. ती खरी करण्याची जबाबदारी जनतेने आपल्यावर सोपविली आहे. अलीकडे महाराष्ट्रात जातीयवाद, सांप्रदायिकतेतून समाजात भेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजातील अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टांपासून आपण दूर होता कामा नये, असे आवाहनही यावेळी केले.
शेवटी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकाला, दरिद्री नारायणाला परमेश्वर मानून त्याची सेवा करत त्या प्रत्येकास रोटी-कपडा-मकान देऊ त्या दिवशी आमचे कार्य पूर्ण होईल, हे दीनदयाळजींचे स्वप्न आपल्याला साकार करावयाचे आहे. समाजाची प्रगती, विकास, पायाभूत सुविधा, रोजगार, शेतकऱ्याचे कल्याण ही आपली कर्तव्ये आहेत, आणि ती पूर्ण करण्याची शक्ती आपल्याकडे, आपल्या नेतृत्वाकडे आहे. केवळ काँग्रेसची सत्ता गेली एवढे पुरेसे नाही. परिस्थिती बदलणार नसेल, तर आपल्या सत्तेने काय केले असा प्रश्न जनता आपल्याला विचारणार आहे. म्हणून काँग्रेसच्या काळात जे झाले नाही ते करून महाराष्ट्राच्या विकास घडविण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya