अध्यक्षांवरील विरोधकांचा अविश्वासाचा ठरावः अजित पवार म्हणाले, माहिती नाही काँग्रेससह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी अविश्वास ठराव दाखल केल्याची चर्चा

नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सातत्याने विरोधी बाकावरील सदस्यांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांना उद्देशून तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका असा इशारा दिला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर विधानसभेने निलंबनाची कारवाई केली. मात्र शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी थेट विधानसभाध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव काल रात्री दाखल केल्याची चर्चा सुरु झाली. यासंदर्भात सकाळी विधानभवन परिसरात बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्याला काही माहितीच नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे विरोधकांमध्ये एकी नसल्याचे स्पष्ट केले.

गुरुवारी मविआच्या काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. काँग्रेस आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांना दिल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रावर ३९ आमदारांची सही असल्याचंही बोलले जात आहे. विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात आज सकाळी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आपल्याला याबाबत काहीच माहिती नाही. मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे, असेही स्पष्ट केले.

त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, अजित पवारांचं वक्तव्य मी पाहिलं. खरंतर सभागृहात कामकाज पाहताना आधी आपल्या विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन सर्व विरोधी सदस्यांनी गोष्टी करायला हव्यात. मात्र, विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता दिसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की मला त्याबद्दल माहिती नाही, तर हे त्याचंच प्रतीक आहे. तसेच, अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट असतो. ते सरळ बोलतात. बेधडक बोलतात. ते कुणाकडूनच नसतात. जे खरं आहे त्या बाजूने ते असतात, अशी सूचक प्रतिक्रियाही व्यक्त केली.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *