मुक्तिदिनी ११ ते १३ ऑक्टोबर पर्यंत तपोवन एक्सप्रेसला नगरसूल येथे तात्पुरता थांबा चैत्यभूमी व दीक्षाभूमीनंतर येवला मुक्तिभूमीसंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार रेल्वेकडून पहिल्यांदाच विशेष सोय

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार येवला मुक्तीभूमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुक्तिदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई (CSMT) – नांदेड तपोवन एक्सप्रेस या रेल्वेला  येवला तालुक्यातील नगरसूल स्थानकावर दि. ११, १२ आणि १३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आला आहे. या तीनही दिवशी मुंबई-नांदेड एक्स्प्रेस सकाळी ११:२४ वा., तर नांदेड-मुंबई एक्स्प्रेस सायं. ३.५९ वा. नगरसूल येथे पोहचेल. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांना या रेल्वेचा विशेष फायदा होणार आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी २१ सप्टेंबर २०२५ रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजयकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहून याबाबत मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला दक्षिण मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद देत ती मंजूर केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित असलेल्या दादरची (मुंबई) चैत्यभूमी आणि नागपूरची दीक्षाभूमी या महत्त्वाच्या ठिकाणांनंतर येवला मुक्तिभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी रेल्वेकडून पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे, मुक्तिदिनी महाराष्ट्राभरातून येवला येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण तपोवन एक्प्रेसला मुक्तिभूमीपासून सर्वात जवळचा थांबा मनमाड रेल्वेस्थानकावर आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना मनमाड येथे उतरून पुन्हा मागे मोठे अंतर कापून यावे लागत होते. परंतु आता मुक्तिभूमीपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या नगरसूल येथे तीन दिवसांसाठी तात्पुरता थांबा मंजूर झाल्यामुळे अतिशय कमी वेळात आंबेडकरी बांधव या ठिकाणी पोहचू शकणार आहेत.

येवला मुक्तिभूमी म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी याच ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हे ठिकाण समस्त आंबेडकरी जनतेसाठी अतिशय वंदनीय असून दरवर्षी या ठिकाणी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत “मुक्तिदिन” साजरा केला जातो. मुक्तिभूमीचे हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून या ठिकाणी सुमारे ३० कोटी रुपये खर्चातून भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल यांसह विविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच नुकतेच मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून हे मुक्तिभूमी स्मारक बार्टीकडे हस्तांतरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून स्मारकाचे वास्तू व्यवस्थापन, देखभाल, सुरक्षा व संबंधित सर्व कामकाजाची जबाबदारी बार्टी, पुणे यांच्याकडे देण्यात आली आहे. रेल्वेच्या उपरोक्त निर्णयामुळे मुक्तिदिनी मुक्तिभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *