पुण्यात बार, हॉटेल रेस्टॉरंट बंद तर ७ दिवस १२ तास संचारबंदी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शुक्रवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच,  पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे.  पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.

 संसर्ग रोखण्यासाठी ‘कोरोना’ निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा – अजित पवार

पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गवाढीचा वेग लक्षात घेत रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यासोबतच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकजुटीने संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

कोरोनाबाधित रूग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले. विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार  वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील टिंगरे, आमदार राहुल कुल, आमदार भिमराव तापकिर, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, आमदार सुनिल शेळके यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. दिलीप मोहीते आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना अत्यावश्यक उपचार मिळाले पाहिजे, त्यादृष्टीने रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी मोठया प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र वाढवून चाचण्यामध्ये वाढ करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन पुरवठा, व्हँटीलेटर यांची संख्या वाढवून वाढवा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, त्याबाबतचे सर्व निकष पाळले जात असतील तरच परवानगी द्यावी. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही आणि ठराविक निर्बंधांचे पालन करुन सर्व व्यवहार सुरळीत ठेवूनही सुरक्षितता जोपासता येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

खासदार गिरीश बापट यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात प्रयत्न करावा, लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. पुढील सहा महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या, ॲक्टीव रुग्ण संख्या, विविध रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रुग्णबेड संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, कोरोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-१९ ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *