स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर देश पाच दशके पुढे गेला असता. नैराश्याने ग्रासलेल्या आणि भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील विराट विजय संकल्प सभेत बोलताना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ,उद्योग मंत्री उदय सामंत,शालेय शिक्षण मंत्री,दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपा मुंबई अध्यक्ष,आशिष शेलार व महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांकरिता आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी मुंबईची वाताहत करून मुंबईच्या विकासाला रोखून ठेवले, सत्तेसाठी नकली शिवसेनेने मुंबईला धोका दिला आणि ते वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कुशीत जाऊन बसले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत पुढे म्हणाले की, ज्यांनी मुंबईची वाताहत केली, मुंबईकरांना वेठीला धरले, त्यांना आता हे क्लीनचीट देत आहेत. याहून मोठा धोका कोणता असू शकतो, असा सवालही केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, धर्माच्या आधारावर आरक्षणास संविधान सभेचाही विरोध होता. पण इंडी आघाडीवाले धर्माच्या आधारावर आरक्षण वाटू पाहात आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असा इशारा देत आता मुंबईकरांची सर्व स्वप्ने, सर्व संकल्प खंबीरपणे पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. येत्या पंचवीस वर्षांचा विकासाचा आराखडा आमच्याकडे आहे, तर इंडी आघाडीच्या काँग्रेसच्या माओवादी जाहीरनाम्यातील घोषणांची अंमलबजावणी केली, तर देशाचे दिवाळे निघेल. काँग्रेसची नजर महिलांच्या मंगळसूत्रावर आहे. मंदिरांच्या संपत्तीवर आहे, आणि वारसांच्या संपत्तीवर आहे, या आरोपांचाही पुनरुच्चार केला.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसची माओवादी विचारसरणी देशासमोरील मोठे संकट ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई हे स्वप्ने जगणारे शहर आहे. स्वप्ने, संकल्प घेऊन येथे येणाऱ्या कोणासही या शहराने कधीच निराश केले नाही. मी देखील विकसित भारताचे स्वप्न, संकल्प घेऊन आज येथे आलो आहे. मुंबईला यासाठी मोठी भूमिका पार पाडायची आहे. जगातील अनेक देश स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढे गेले, आपणच मागे पडलो, कारण या देशाच्या नेतृत्वाने कधी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वासच ठेवला नाही. देशाचे पंतप्रधानच जेव्हा लाल किल्ल्यावरून देशवासीयांना आळशी म्हणत होते, जी सरकारेच असा विचार करतात, ते देशाला कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्ल्यानुसार जर काँग्रेस विसर्जित केली असती, तर आज भारत किमान पाच दशके पुढे गेला असता. भारताच्या सर्व व्यवस्थांचे काँग्रेसीकरण झाल्यामुळे देशाची पन्नास वर्षे बरबाद झाली. स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारत सहाव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था होता, २०१४ मध्ये काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर गेली होती. गेल्या दहा वर्षांत आज देश जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक शक्ती म्हणून उभा असल्याचा दावाही यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्यांच्या मनात आशा निर्माण करणे अवघड असते. निराश लोकांना कोणतीच गोष्ट शक्य वाटत नाही. राम मंदिरदेखील त्यांना अशक्य वाटत होते, केव्हातरी जगाला हे वास्तव मान्य करावेच लागेल, की भारताची जनता आपले विचार, निर्धार आणि संकल्पावर एवढे ठाम होते, की एका स्वप्नासाठी त्यांनी पाचशे वर्षे अविरत संघर्ष केला आहे. पाचशे वर्षे उराशी बाळगलेले राम मंदिराचे स्वप्न आज साकार झाले आहे. याच नैराश्यग्रस्तांना कलम ३७० रद्द करणेही अशक्य वाटत होते, पण आता या अडथळ्यास आम्ही कब्रस्तानात गाडले आहे. आता ते पुन्हा प्रस्थापित करण्याची हिंमत जगातील कोणतीही शक्तीकडे नाही, ४० वर्षे महिला ३३ टक्के आरक्षणाची प्रतीक्षा करत होत्या. आज संविधानाच्या नावाने ओरड करणाऱ्यांनी संसदेतील आरक्षण विधेयक फाडून फेकले होते. त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण दिले. सातत्याने गरीबीच्या नावाने जपमाळ करणाऱ्यांनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली होती. आपल्या पुढच्या पिढीचे उज्जवल भविष्य, सुरक्षितता, विकास, भारताची जागतिक प्रतिष्ठा, यासाठी घराबाहेर पडा आणि आपल्या मताचा वापर करून देशाच्या विकासाची वाटचाल मजबूत करा, असे आवाहनही केले.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच मविआचा टीका करताना म्हणाले की, जे सत्तेतच येणार नाहीत, त्यांच्याबद्दल कशाला बोलायचे, मोदीजी होते म्हणून राम मंदिर झाले. मोदीजी होते म्हणून ३७० कलम रद्द झाले. मोदीजी होते म्हणून तिहेरी तलाक पद्धती रद्द होऊन शाहबानोला न्याय मिळाला. इतकी वर्षे जे झाले नाही, ते करून घेणे सर्वात महत्वाचे, म्हणून मी मोदीजींसोबत आहे. पुढच्या पाच वर्षाकरिता आमच्या आपल्याकडून अनेक अपेक्षा आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, देशाच्या अभ्यासक्रमात सव्वाशे वर्षांच्या मराठा साम्राज्याचा इतिहास समाविष्ट करावा, शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी, देशात अनेक ठिकाणी उत्तम रस्ते आहेत, गेल्या १८-१९ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, संविधानाला धक्का लागणार असा प्रचार करणाऱ्यांना एकदाच खणखणीत उत्तर देऊन त्यांची तोंडे बंद करा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya